Tokyo Olympics : महाराष्ट्राचा गोल्फपटू उदयन माने ऑलिम्पिकसाठी पात्र; क्रीडामंत्र्यांनी केले अभिनंदन

Tokyo Olympics : महाराष्ट्राचा गोल्फपटू उदयन माने ऑलिम्पिकसाठी पात्र; क्रीडामंत्र्यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्राचा गोल्फपटू उदयन माने ऑलिम्पिकसाठी पात्र

महाराष्ट्राचा गोल्फपटू उदयन माने आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आदिती अशोक आणि अनिर्बन लाहिरी यांच्यानंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार माने हा भारताचा तिसरा गोल्फपटू आहे. या यशाबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी त्याचे कौतुक केले आहे. ‘आज जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीनुसार, उदयन माने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन गोल्फपटू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो,’ असे रिजिजू त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

एक स्पर्धाही जिंकली

पुणेकर उदयन मानेने नुकताच कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. एका वर्षभरात मानेने चांगली कामगिरी करताना एक स्पर्धाही जिंकली होती. याचा त्याला क्रमवारीत फायदा झाला आणि त्याने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला. यंदा टोकियो येथे होणारी ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारताकडून उदयन माने आणि अनिर्बन लाहिरी या पुरुष गोल्फपटूंना, तसेच आदिती अशोक या महिला गोल्फपटूला पात्र ठरण्यात यश आले आहे.

आदितीचे दमदार कामगिरीचे लक्ष्य 

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची अनिर्बन लाहिरी आणि आदिती अशोकची ही सलग दुसरी वेळ असणार आहे. हे दोघेही मागील म्हणजेच २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळले होते. आदितीला रिओमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. यंदा मात्र दमदार कामगिरीचे तिचे लक्ष्य आहे. तसेच महिला गोल्फपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याने भारतात गोल्फची लोकप्रियता वाढण्यात मदत होऊ शकेल असे आदितीला वाटते.

First Published on: July 6, 2021 10:19 PM
Exit mobile version