Tokyo Olympics : स्टेफानोस त्सीत्सीपासला पराभवाचा धक्का; मेदवेदेव्हची आगेकूच

Tokyo Olympics : स्टेफानोस त्सीत्सीपासला पराभवाचा धक्का; मेदवेदेव्हची आगेकूच

स्टेफानोस त्सीत्सीपासला पराभवाचा धक्का

ग्रीसचा टेनिसपटू स्टेफानोस त्सीत्सीपासचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्सीत्सीपासला पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत फ्रेंचच्या उगो हंबर्टने २-६, ७-६ (७-४), ६-२ असा पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात त्सीत्सीपासला दुखापतही झाली. पायाच्या दुखापतीमुळे दुसऱ्या सेटमध्ये त्याला मेडिकल टाईम-आऊट घ्यावा लागला. त्यानंतर त्याने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. परंतु, या दुखापतीमुळे त्याला सर्वोत्तम खेळ करणे जमले नाही. दुसरीकडे रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हला मात्र स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. त्याने इटलीच्या फॅबिओ फॉगनिनिचा ६-२, ३-६, ६-२ असा पराभव केला.

दुखापत झाल्याने त्सीत्सीपासचा खेळ खालावला

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत हंबर्टविरुद्धच्या सामन्यात त्सीत्सीपासने चांगली सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये त्याने हंबर्टची सर्व्हिस दोनदा मोडली. त्यामुळे त्याने हा सेट ६-२ अशा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र दुखापत झाल्याने त्सीत्सीपासचा खेळ खालावला. टाय-ब्रेकरमध्ये गेलेले हा सेट हंबर्टने ७-४ असा जिंकल्याने सामन्यात बरोबरी झाली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये हंबर्टने पुन्हा ६-२ अशी बाजी मारत स्पर्धेत आगेकूच केली. त्याचा उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या कारेन खाचानोव्हशी सामना होईल.

मेदवेदेव्हला जाणवला उष्णतेचा त्रास

दुसरीकडे मेदवेदेव्हने इटलीच्या फॅबिओ फॉगनिनिचा ६-२, ३-६, ६-२ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्या फेरीत उष्णतेचा त्रास झाल्याने मेदवेदेव्हने आयोजकांना दुसऱ्या फेरीतील सामन्याची वेळ थोडी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु, या सामन्यातही उष्ण वातावरणाचा मेदवेदेव्हला सामना करावा लागला. परंतु, त्यानंतरही त्याने चांगला खेळ करत हा सामना जिंकला. पुढील फेरीत त्याच्यापुढे स्पेनच्या पाब्लो कारेनो बुस्ताचे आव्हान असेल.

First Published on: July 28, 2021 3:27 PM
Exit mobile version