Tokyo Olympics : विजेंदर, मेरी कोम यांच्या पंक्तीत स्थान मिळवणारी लोव्हलिना बोर्गोहेन आहे तरी कोण?

Tokyo Olympics : विजेंदर, मेरी कोम यांच्या पंक्तीत स्थान मिळवणारी लोव्हलिना बोर्गोहेन आहे तरी कोण?

भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. भारताने ऑलिम्पिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी पदकांचे खाते उघडले होते. वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. परंतु, दुसऱ्या पदकासाठी भारताला बराच काळ वाट पाहावी लागली. अखेर शुक्रवारी बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने महिलांच्या ६९ किलो वजनी गटाची उपांत्य फेरी गाठल्याने भारताला आणखी एक पदक मिळणार हे निश्चित झाले आहे. २३ वर्षीय लोव्हलिनाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चिनी तैपेईच्या निन चीन चेनवर ४-१ अशी मात केली. या विजयासह तिचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळवणारी लोव्हलिना ही विजेंदर सिंग (२००८) आणि मेरी कोम (२०१२) यांच्यानंतरची तिसरी भारतीय बॉक्सर आहे. मात्र, लोव्हलिना बोर्गोहेन नक्की आहे तरी कोण?

अर्जुन पुरस्काराने सन्मानित

लोव्हलिनाचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ साली आसाम येथील गोलाघाटमध्ये झाला. तिला दोन मोठ्या बहिणी असून त्या जुळ्या आहेत. या दोघीही राष्ट्रीय किक-बॉक्सिंग स्पर्धेत खेळल्या आहेत. लोव्हलिनाही सुरुवातीला किक-बॉक्सिंग करत होती. मात्र, काही काळाने तीन बॉक्सिंगकडे वळली. ती ६९ किलो (वॉल्टरवेट) वजनी गटात खेळते. लोव्हलिनाला २०१७ मध्ये आशियाई स्पर्धा (कांस्य), २०१८ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (कांस्य), २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा (कांस्य), २०२१ आशियाई स्पर्धा (कांस्य) आदी स्पर्धांमध्ये पदक मिळवण्यात यश आले आहे. तसेच २०२० मध्ये तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आसामची बॉक्सर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये  

मागील वर्षी मार्चमध्ये जॉर्डन येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत लोव्हलिनाने उझबेकिस्तानच्या माफटूनखॉन मेलिएव्हाचा पराभव केला होता. या विजयासह तिने ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी लोव्हलिना ही आसामची पहिलीच बॉक्सर होती. मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने भारताच्या आघाडीच्या बॉक्सर्ससाठी युरोप दौरा आयोजित केला होता. मात्र, इटलीला रवाना होण्यापूर्वी लोव्हलिनाला कोरोनाची बाधा झाली. याचा तिच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत पदक निश्चित केले आहे.

First Published on: July 30, 2021 1:28 PM
Exit mobile version