टॉटनहॅमची मँचेस्टर सिटीवर मात

टॉटनहॅमची मँचेस्टर सिटीवर मात

Tottanham

सॉन ह्युन्ग मिनने केलेल्या उत्कृष्ट गोलच्या जोरावर टॉटनहॅम हॉट्सपरने व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लीगमध्ये मँचेस्टर सिटीचा १-० असा पराभव केला. हा टॉटनहॅमच्या नव्या स्टेडियमवरील पहिला चॅम्पियन्स लीग सामना होता आणि तो त्यांना जिंकण्यात यश आले. या लढतीचा दुसरा लेग सिटीच्या मैदानावर १८ एप्रिलला होणार आहे.

मँचेस्टर सिटीने या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगआधी सर्व स्पर्धांमध्ये मिळून २३ पैकी २२ सामना जिंकले होते आणि त्यांनी टॉटनहॅमविरुद्धच्या या सामन्याची सुरुवातही त्याच आत्मविश्वासाने केली. या सामन्याच्या १२ व्या मिनिटाला सिटीच्या रहीम स्टर्लिंगने मारलेला फटका टॉटनहॅमच्या डॅनी रोजच्या हाताला लागल्यामुळे सिटीला पेनल्टी मिळाली. सर्जिओ अगुव्हेरोने मारलेली ही पेनल्टी टॉटनहॅमचा गोलरक्षक आणि कर्णधार ह्यूगो लॉरिसने अडवली. त्यामुळे सिटीला आपले गोलचे खाते उघडता आले नाही. यानंतर टॉटनहॅमनेही चांगला खेळ करण्यास सुरुवात केली. २४ व्या मिनिटाला टॉटनहॅमचा स्ट्रायकर हॅरी केनने मारलेला फटका सिटीचा गोलरक्षक एडरसनने अडवला. यानंतर दोन्ही संघाना गोल करण्याच्या संधी निर्माण करता आल्या नाहीत आणि त्यामुळे मध्यंतराला हा सामना ०-० असाच बरोबरीत राहिला.

मध्यंतरानंतर सिटीने आक्रमक सुरुवात केली. ४७ व्या मिनिटाला अगुव्हेरोला पुन्हा एकदा गोल करण्याची संधी मिळाली आणि पुन्हा त्याला या संधीचा वापर करता आला नाही. ५५ व्या मिनिटाला टॉटनहॅमचा स्टार खेळाडू हॅरी केनला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. मात्र, तो नसतानाही टॉटनहॅमने चांगला खेळ केला आणि याचा फायदा त्यांना ७८ व्या मिनिटाला मिळाला. क्रिस्टियन एरिक्सनच्या पासवर सॉन ह्युन्ग मिनने गोल करून टॉटनहॅमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर त्यांनी भक्कम बचाव करत सिटीला गोल करू दिला नाही आणि सामना १-० असा जिंकला.

लिव्हरपूलचा विजय

नॅबी केटा आणि रॉबर्टो फर्मिनो यांच्या गोलमुळे इंग्लिश संघ लिव्हरपूलने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये पोर्तुगीज संघ पोर्टोवर २-० अशी मात केली. या सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धातच झाले. नॅबी केटाने ५ व्या तर रॉबर्टो फर्मिनोने २६ व्या मिनिटाला गोल केला. या सामन्यात आक्रमकपणे खेळणार्‍या लिव्हरपूलला गोल करण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या, पण त्यांना दोनच गोल करता आले.

First Published on: April 11, 2019 4:07 AM
Exit mobile version