वर्ल्डकपचा विचार न करण्याचा प्रयत्न !

वर्ल्डकपचा विचार न करण्याचा प्रयत्न !

आयपीएलच्या नव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात झाली. आयपीएलचा हा मोसम संपताच काही दिवसांत विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करणे सर्व खेळाडूंचे लक्ष्य आहे. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक विश्वचषकाबाबत फार विचार न करण्याचा प्रयत्न करत आहे.

विश्वचषकाचा मी जितका विचार कमी करेन, तितके माझ्यासाठी चांगले आहे. त्यामुळे मी विश्वचषकाचा विचार न करण्याचा प्रयत्न करत आहे. कोलकातासाठी चांगली कामगिरी करणे आणि संघाला विजय मिळवून देणे ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मी जर चांगला खेळलो तर आपोआपच विश्वचषकाच्या संघात मला स्थान मिळेल याची मला खात्री आहे, असे कार्तिकने सांगितले.

तसेच विश्वचषकामुळे यंदाच्या आयपीएलला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे का असे विचारले असता कार्तिक म्हणाला, माझ्यासारख्या खेळाडूसाठी प्रत्येक मोसम महत्त्वाचा असतो. यंदाचा मोसमही काही वेगळा नाही. मागील मोसमात मी बर्‍याच सामन्यांत १७ व्या षटकात फलंदाजीला आलो. यावेळी मी जास्त षटके खेळीन का हे सांगता येत नाही. हे सामन्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. जर मला जास्त षटके खेळण्याची संधी मिळाली, तर ती मला माझी प्रतिभा दाखवण्याची संधी असेल.

First Published on: March 25, 2019 4:23 AM
Exit mobile version