चेल्सी, लिव्हरपूलचा बाद फेरीत प्रवेश

चेल्सी, लिव्हरपूलचा बाद फेरीत प्रवेश

चेल्सी, गतविजेते लिव्हरपूल या इंग्लिश संघांनी युएफा चॅम्पियन्स लीगच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. या दोन्ही संघांना पुढील फेरी गाठण्यासाठी आपापले अखेरचे साखळी सामने जिंकणे गरजेचे होते आणि त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ करत हे सामने जिंकलेच. चेल्सीने फ्रेंच संघ लिलवर २-१ अशी मात केली. तर लिव्हरपूलने आरबी साल्झबर्गला २-० असे पराभूत केले. तसेच मागील मोसमात उपांत्य फेरी गाठणार्‍या आयेक्सचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. त्यांचा स्पॅनिश संघ वेलंसियाने १-० असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

गट एचमधील लिलविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीपासूनच चेल्सीने आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना १९ व्या मिनिटाला मिळाला. विलियनच्या पासवर स्ट्रायकर टॅमी अब्राहमने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर ३५ व्या मिनिटाला चेल्सीला कॉर्नर किक मिळाली. इमर्सनच्या क्रॉसवर कर्णधार सेझार अ‍ॅझपिलिक्वेटाने अप्रतिम हेडर मारत गोल केला आणि चेल्सीला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांना मध्यंतरापर्यंत राखण्यात यश आले.

मध्यंतरानंतरही चेल्सीने आपला दमदार खेळ सुरु ठेवला. त्यामुळे त्यांना गोल करण्याच्या सलग दोन संधी मिळाल्या. मात्र, लिलचा गोलरक्षक मैग्ननच्या अप्रतिम खेळामुळे चेल्सीला आपली आघाडी वाढवता आली नाही. यानंतर चेल्सीने काही राखीव खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आणि याचा फायदा लिल संघाला झाला. ७८ व्या मिनिटाला स्ट्रायकर लॉईक रेमीने केलेल्या गोलमुळे लिलने चेल्सीची आघाडी १-२ अशी कमी केली. मात्र, यानंतर त्यांना आणखी गोल करता आला नाही आणि चेल्सीने सामना जिंकत बाद फेरी गाठली.

दुसरीकडे गतविजेत्या लिव्हरपूलने आरबी साल्झबर्ग संघाला सहज पराभूत केले. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. परंतु, मध्यंतरानंतर लिव्हरपूलने आपला खेळ उंचावला. ५७ व्या मिनिटाला नॅबी केटा, तर पुढच्याच मिनिटाला मोहम्मद सलाहने केलेल्या गोळीमुळे लिव्हरपूलने हा सामना २-० असा जिंकला. याच गटातील दुसर्‍या सामन्यात नॅपोली संघाने गेंकचा ४-० असा धुव्वा उडवला.

इंटर मिलानचा पराभव

युएफा चॅम्पियन्स लीगच्या गट एफमधील सामन्यात बार्सिलोनाने इटालियन संघ इंटर मिलानचा २-१ असा पराभव केला. त्यामुळे इंटरचा संघ स्पर्धेत आगेकूच करु शकला नाही. बार्सिलोनाने याआधी बाद फेरी गाठली होती. त्यामुळे त्यांनी या सामन्यात बर्‍याच युवा खेळाडूंना संधी दिली. मात्र, याचा इंटरला फायदा घेता आला नाही. कार्ल्स पेरेझ आणि अंसू फाटी यांनी अनुक्रमे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात गोल करत बार्सिलोनाला हा सामना जिंकवून दिला. इंटरचा एकमेव गोल रोमेलू लुकाकूने केला. याच गटात डॉर्टमंडने साल्विया प्रागवर २-१ अशी मात केली.

First Published on: December 12, 2019 5:28 AM
Exit mobile version