अटलांटाने उडवला वेलंसियाचा धुव्वा

अटलांटाने उडवला वेलंसियाचा धुव्वा

हान्स हाटेबोरच्या दोन गोलच्या जोरावर अटलांटाने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये वेलंसियाचा ४-१ असा धुव्वा उडवला. चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्याची ही इटालियन संघ अटलांटाची पहिलीच वेळ असून दुसर्‍या लेगमध्ये चांगली कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची त्यांना संधी आहे.

बुधवारी रात्री झालेल्या पहिल्या लेगची अटलांटाने आक्रमक सुरुवात केली. १६ व्या मिनिटाला कर्णधार आलेहान्द्रो गोमेझच्या अप्रतिम पासवर हाटेबोरने गोल करत अटलांटाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ४२ व्या मिनिटाला जोसेप इलीचीचने अटलांटाची आघाडी दुप्पट केली. त्यांनी ही आघाडी मध्यंतरापर्यंत राखली. उत्तरार्धातही त्यांनी आक्रमक खेळ सुरु ठेवला. ५७ व्या मिनिटाला रेमो फ्रेउलर आणि ६२ व्या मिनिटाला हाटेबोरने गोल केल्याने अटलांटाला ४-० अशी आघाडी मिळाली.

पुढे ६६ व्या मिनिटाला वेलंसियाच्या डेनिस चेरशेव्हने गोल करत अटलांटाची आघाडी १-४ अशी कमी केली. यानंतर मात्र वेलंसियाला गोल करता आला नाही आणि अटलांटाने हा सामना ४-१ असा जिंकला. उप-उपांत्यपूर्व फेरीतच आरबी लॅपझिंगने टॉटनहॅमचा १-० असा पराभव केला. त्यांचा हा गोल टिमो वर्नरने केला.

First Published on: February 21, 2020 5:37 AM
Exit mobile version