UEFA EURO : अंतिम सामन्याला गालबोट; हिंसाचार करणाऱ्या ४९ चाहत्यांना ब्रिटिश पोलिसांकडून अटक

UEFA EURO : अंतिम सामन्याला गालबोट; हिंसाचार करणाऱ्या ४९ चाहत्यांना ब्रिटिश पोलिसांकडून अटक

अंतिम सामन्याला गालबोट; हिंसाचार करणाऱ्या ४९ चाहत्यांना ब्रिटिश पोलिसांकडून अटक

इंग्लंड आणि इटली या संघांमधील युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. या सामन्यात इटलीने विजय मिळवत दुसऱ्यांदा युरो स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली. परंतु, चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्याला गालबोट लागले. इंग्लंडची राजधानी लंडनमधील वेम्बली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये चमकम झाली. तसेच वेम्बली स्टेडियमच्या परवानगी नसलेल्या भागात या चाहत्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबवणाऱ्या सुरक्षारक्षकांनाही या चाहत्यांनी इजा पोहोचवली. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्या ४९ चाहत्यांना ब्रिटिश पोलिसांकडून अटक करण्यात आली.

१९ पोलीस जायबंदी

आम्ही विविध कारणांनी ४९ जणांना अटक केली आहे, असे मेट्रोपोलिटन पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच या हिंसाचार करणाऱ्या चाहत्यांना अडवताना १९ पोलीस जायबंदी झाले. इंग्लंड आणि इटली यांच्यातील अंतिम सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच काही तास हजारो चाहते स्टेडियमच्या शेजारी आणि रेल्वे स्टेशनवर जमले होते. तसेच बरेच चाहते ट्रेनमधून गाणी गात वेम्बली स्टेडियम गाठत होते. यापैकी अनेकांनी मद्यपान केले होते.

बाटल्या फेकण्यात आल्या

सामन्याआधी दोन तास काही चाहत्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवत मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच बाहेरच्या बाजूने बाटल्याही फेकण्यात आल्या. त्यामुळे साधारण २० मिनिटे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देणे थांबवण्यात आले होते. मात्र, स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहत्यांनी मद्यपान करत आणि जोरजोरात ओरडत धिंगाणा घातला. त्यामुळे प्रवेशद्वारांजवळ असलेल्या रस्तावर दारूचे असंख्य रिकामे कॅन पडलेले दिसले.

First Published on: July 12, 2021 4:13 PM
Exit mobile version