आर्सनल-स्टँडर्ड लीग सामन्यात बरोबरी, लॅझिओ स्पर्धेबाहेर

आर्सनल-स्टँडर्ड लीग सामन्यात बरोबरी, लॅझिओ स्पर्धेबाहेर

दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करत आर्सनलाने युएफा युरोपा लीगच्या सामन्यात स्टँडर्ड लीग संघाला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे त्यांनी गट एफमध्ये अव्वल स्थान मिळवले. इटालियन संघ लॅझिओ आणि युक्रेनियन संघ डिनॅमो किएव्ह यांच्यावर मात्र स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली. इंग्लंडमधील बलाढ्य संघ मँचेस्टर युनायटेडने एझे अल्कमार संघावर ४-० अशी मात केली. त्यांच्याकडून या सामन्यात मेसन ग्रीनवूडने दोन, तर अ‍ॅश्ली यंग आणि ग्वान माटाने प्रत्येकी एक गोल केला.

आर्सनल आणि स्टँडर्ड लीग या गट एफमध्ये समाविष्ट असलेल्या संघांतील सामना चुरशीचा झाला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र, उत्तरार्धात सामन्यात रंगत आली. ४७ व्या मिनिटाला सॅम्युएल बॅस्टियन आणि ६९ व्या मिनिटाला सलीम अमल्लाहने गोल करत स्टँडर्ड लीगला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांची ही आघाडी काही मिनिटेच टिकू शकली.

७८ व्या मिनिटाला आर्सनलच्या अ‍ॅलेक्सांडर लॅकाझेटने गोल करत स्टँडर्ड लीगची आघाडी १-२ अशी कमी केली. तीन मिनिटांनंतरच गॅब्रिएल मार्टिनेल्लीच्या पासवर बुकायो साकाने गोल करत आर्सनलला २-२ अशी बरोबरी करुन दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करता न आल्याने सामना बरोबरीतच संपला. या गटाच्या दुसर्‍या सामन्यात जर्मन संघ फ्रँकफर्टला व्हिक्टोरिया एससीने २-३ असे पराभूत केले.

दुसरीकडे इ गटात लॅझिओ संघाला फ्रेंच संघ रेनिसने २-० असे पराभूत केले. रेनिसचे दोन्ही गोल जॉरिस नग्नोनने केले. या पराभवामुळे त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले. या गटातून सेल्टिक आणि क्लूज या संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला. क्लूजने प्राथमिक फेरीतील अखेरच्या सामन्यात सेल्टिकवर २-० अशी मात केली.

गट केमधील सामन्यात इंग्लिश संघ वोल्व्हसने पोर्तुगीज संघ बेसिक्तासचा ४-० असा धुव्वा उडवला. वोल्व्हसकडून डिओगो जोटाने अवघ्या ११ मिनिटांतच हॅटट्रिक केली. त्याने ५७, ६३ आणि ६८ व्या मिनिटाला गोल केले. त्यांचा चौथा गोल लिअँडर डेंडाँकरने केला.

First Published on: December 14, 2019 5:45 AM
Exit mobile version