अफगाणिस्तानच्या फूटबॉलपटू कडून भारतीय खेळाडूंना मारहाण

अफगाणिस्तानच्या फूटबॉलपटू कडून भारतीय खेळाडूंना मारहाण

भारत आणि अफगाणिस्तानच्या ( India and Afghanistan) खेळाडूंचे संबंध क्रिकेटमध्ये चांगले आहेत. पण फुटबॉलमध्ये तसं दिसत नाहीये. काल शनिवारी रात्री खेळण्यात आलेल्या AFC एशिया कप क्वाॅलिफायर्स-२०२३ मध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तानचा २-१ ने पराभव केला. या पराभवामुळे निराश झालेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंशी गैरवर्तन केले. याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू दोन भारतीय खेळाडूंसोबत भांडताना दिसत आहेत. काही वेळाने संपूर्ण अफगाण संघ येतो आणि त्यांच्यासोबत धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतो.

टीम इंडियाचा गोलकीपर गुरप्रीत सिंग दोन्ही संघांना शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण त्यालाही अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडून धक्काबुक्की करण्यात येते. यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आपल्या सहकारी खेळाडूंना वाचवण्यासाठी गेले, मात्र हाणामारी थांबली नाही. मारहाण का झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच दोन्ही संघांनी या कारणाबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही.

टीम इंडियाचा कर्णधार सुनील छेत्रीने सामन्यात अप्रतिम गोल केला. त्याने ८५व्या मिनिटाला फ्री-किकवर गोल मारुन टीम इंडियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, पण अफगाणिस्तानने ८८ मिनिटाला झुबेर अमीरीने फ्री-किकवर गोल करत सामना बरोबरीत आणला. यानंतर, सहल अब्दुल समदने केलेल्या शानदार स्ट्राईकने ९०+२ मिनिटांत सामना संपण्यापूर्वी टीम इंडियासाठी निर्णायक गोल केला. त्यामुळे टीम इंडियाला मिळालेल्या या विजयासह भारतीय संघ स्पर्धेच्या ग्रुप-डीमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.


हेही वाचा : ENG vs NZ: ट्रेंट बोल्टची इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट खेळी, मुथय्या मुरलीधरनचा मोडला विश्वविक्रम


 

First Published on: June 12, 2022 8:51 PM
Exit mobile version