French Open 2020 : व्हिक्टोरिया अझारेंकाला पराभवाचा धक्का 

French Open 2020 : व्हिक्टोरिया अझारेंकाला पराभवाचा धक्का 

व्हिक्टोरिया अझारेंका

बेलारूसची स्टार टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेंकाला फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. नुकत्याच झालेल्या अमेरिकन ओपनची उपविजेती ठरलेल्या अझारेंकाला दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अॅना कॅरोलिना श्मीदलोव्हाने ६-२, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. अझारेंका फ्रेंच ओपनमध्ये खेळताना फारशी खुश दिसली नाही. तिने पहिल्या फेरीत विजय मिळवला होता, पण सामन्यातील थंड वातावरणाविषयी तक्रार केली होती. दुसऱ्या फेरीत तिला चांगला खेळ करता आला नाही.

श्मीदलोव्हाचे दमदार पुनरागमन

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत अझारेंकावर श्मीदलोव्हाने ६-२, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. २०१९ मध्ये श्मीदलोव्हाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये तिने दमदार पुनरागमन केले आहे. तिने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सला पराभूत केले. तर दुसऱ्या फेरीत अझारेंकाला पराभवाचा धक्का दिला. तिसऱ्या सीडेड एलिना स्वीतोलिनाला मात्र तिचा दुसऱ्या फेरीतील सामना जिंकण्यात यश आले. तिने मेक्सिकोच्या रेनाता झाराझुआचा ६-३, ०-६, ६-२ असा पराभव केला. पुरुष एकेरीत ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासने स्पेनच्या मौनारवर ४-६, २-६, ६-१, ६-४, ६-४ अशी मात करत दुसरी फेरी गाठली.

सेरेना विल्यम्सची माघार

अमेरिकेची महान खेळाडू सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे फ्रेंच ओपनमधून माघार घेतली. तिने पहिल्या फेरीत क्रिस्टी अहानचा ७-६, ६-० असा पराभव केला होता, तर दुसऱ्या फेरीत स्वेताना पीरॉनकोव्हाशी तिचा सामना होणार होता. मात्र, सामना सुरु होण्याआधी पायाला झालेल्या दुखापतीमुळे तिला सामना आणि स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले. याआधी तीन वेळा फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या सेरेनाला यंदाही ही स्पर्धा जिंकण्यासाठी दावेदार मानले जात होते.

First Published on: September 30, 2020 8:37 PM
Exit mobile version