कोहली विरोधी संघांच्या प्रशिक्षकांसाठी डोकेदुखी!

कोहली विरोधी संघांच्या प्रशिक्षकांसाठी डोकेदुखी!

इयन चॅपल यांचे मत

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे सध्याच्या घडीला जगातील दोन सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये सतत तुलना होत असते. तसेच या दोघांपैकी सर्वोत्तम कोण असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

मात्र, त्याने पुनरागमनात अप्रतिम कामगिरी करत स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केले. यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेच्या ४ सामन्यांत स्मिथने ११०.५७ च्या सरासरीने ७७४ धावा करत जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत कोहलीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे कोहली एकदिवसीय क्रमवारीत अव्वल, तर कसोटी क्रमवारीत दुसर्‍या स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही फलंदाजांचे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपल यांनी कौतुक केले. तसेच कोहली हा विरोधी संघांच्या प्रशिक्षकांसाठी डोकेदुखी आहे, असे चॅपल यांना वाटते.

स्मिथची खेळण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे ’तो सातत्याने इतकी चांगली कामगिरी कशी करतो?’, असा मला प्रश्न पडतो. स्मिथ वेगळ्याच दिशांना चेंडू फटकावतो. तो कधीतरी इतरांपेक्षा वेगळ्या खेळपट्टीवर खेळत आहे, असेही वाटते. जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जाण्यासाठी स्मिथला विराट कोहली आव्हान देतो. कोहली आणि स्मिथ यांची खेळण्याची पद्धत, तंत्र पूर्णतः वेगळे आहे. कोहली आधुनिक काळातील रिव्हर्स-स्वीपसारखे फटके मारत नाही, कारण त्यामुळे कसोटीतील फलंदाजीवर परिणाम होईल असे त्याला वाटते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या युवा खेळाडूंसाठी कोहली हा आदर्श आहे. तसेच तो विरोधी संघांच्या प्रशिक्षकांसाठी डोकेदुखी आहे, कारण आताचे प्रशिक्षक आधुनिक पद्धतींचा वापर करतात आणि जुन्या पद्धतींकडे दुर्लक्ष करतात, असे चॅपल म्हणाले.

स्मिथबाबत त्यांनी पुढे सांगितले, स्मिथने स्वतःला फायदेशीर फलंदाजीची पद्धत शोधून काढली आहे आणि तो मानसिकदृष्ठ्या खूपच सक्षम आहे. गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी तो बर्‍याच हालचाली करतो, पण चेंडू खेळण्याची वेळ येते तेव्हा तो अगदी स्थिर असतो. त्यामुळेच तो इतका यशस्वी होत आहे.

First Published on: November 12, 2019 5:45 AM
Exit mobile version