भारताचा ‘हा’ खेळाडू दशकातील सर्वात मोठा मॅचविनर – गावस्कर   

भारताचा ‘हा’ खेळाडू दशकातील सर्वात मोठा मॅचविनर – गावस्कर   

विराट कोहली आणि धोनी 

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. तसेच त्याची एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होते. कोहलीने नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने हा विक्रम रचताना भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकले. कोहलीची ही कामगिरी पाहता आणि त्याने भारताला किती सामने जिंकवले आहेत हे लक्षात घेता, त्याला मागील १० वर्षांतील सर्वात मोठा मॅचविनर म्हणावे लागेल, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

भारतीय संघ धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीने केलेली कामगिरी फारच उत्कृष्ट आहे. त्याने भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. मी केवळ खेळाडूने केलेल्या धावा किंवा घेतलेल्या विकेटचा विचार करत नाही. कोणता खेळाडू सामन्यावर सर्वाधिक प्रभाव पाडतो हे मी पाहतो. त्यामुळे विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये या दशकात भारतासाठी सर्वात मोठा मॅचविनर होता असे मला वाटते, असे गावस्कर यांनी सांगितले.

गावस्करांच्या मताशी हेडन असहमत

सुनील गावस्करांच्या मताशी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन मात्र सहमत नव्हता. माझ्या मते, मागील दहा वर्षांत महेंद्रसिंग धोनी भारतासाठी सर्वात मोठा मॅचविनर होता. धोनीने भारताला विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन स्पर्धा जिंकवून दिल्या. विश्वचषक जिंकण्यासाठी संघाला चांगल्या कर्णधाराची आणि मधल्या फळीत संयम राखून खेळू शकेल अशा फलंदाजाची गरज असते. धोनीने या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडल्या, असे हेडन म्हणाला.

First Published on: December 10, 2020 8:44 PM
Exit mobile version