विराट कोहली जगातला सर्वोत्तम फलंदाज – जो रूट 

विराट कोहली जगातला सर्वोत्तम फलंदाज – जो रूट 

विराट कोहली आणि जो रूट   

भारताचा कर्णधार विराट कोहली हा कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, असे मत इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने व्यक्त केले. सध्याच्या घडीला कोहली, रूट, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे जगातील चार सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. त्यांना ‘फॅब फॉर’ म्हणून ओळखले जाते. मात्र, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता कोहलीमध्ये आहे, असे रूटला वाटते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा कोहली हा एकमेव फलंदाज आहे.

सर्वात परिपूर्ण फलंदाज

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून बोलायचे, तर विराट सर्वोत्तम आणि सर्वात परिपूर्ण फलंदाज आहे, असे मला वाटते. खासकरून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना खेळ उंचावण्याची त्याच्यात जी क्षमता आहे, ती इतर कोणातही नाही. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना तो ज्या वेगाने धावा करतो, ज्या सातत्याने धावा करतो आणि जितके वेळा स्वतः नाबाद राहून संघाला सामने जिंकवून देतो, ते फारच कौतुकास्पद आहे, असे रूट म्हणाला.

प्रत्येकच देशात चांगली कामगिरी

कोहलीला २०१४ इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. मात्र, त्यानंतर २०१८ इंग्लंड दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून त्याने ८९४ धावा केल्या होत्या. याबाबत रूटने सांगितले, विराटला त्याच्या पहिल्या इंग्लंड दौऱ्यात चांगले खेळ करता आला नाही. मात्र, दुसऱ्या दौऱ्यात त्याने दमदार पुनरागमन करत मोठ्या धावा केल्या. केवळ इंग्लंडमध्येच नाही, तर त्याने जवळपास प्रत्येकच देशात चांगली कामगिरी केली आहे.

First Published on: October 24, 2020 6:12 PM
Exit mobile version