IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थितीचा ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर्सला फटका!

IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थितीचा ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर्सला फटका!

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहली आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन कसोटी सामन्यांत खेळणार नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कोहली एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतील सर्व सामने खेळणार असला तरी कसोटी मालिकेत तो केवळ एकच सामना खेळू शकणार आहे. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या पाल्याला जन्म देणार आहे. त्यामुळे कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. याचा ऑस्ट्रेलियातील सामन्यांचे प्रक्षेपण करणारी वाहिनी ‘चॅनल ७’ ला फटका बसणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांचे प्रक्षेपण ‘चॅनल ७’ आणि ‘फॉक्स स्पोर्ट्स’ या दोन वाहिन्या करणार आहेत. चॅनल ७ वरील सामने मोफत दाखवण्यात येतात, तर फॉक्स स्पोर्ट्सवर सामने पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना पैसे द्यावे लागतात. या दोन्ही वाहिन्यांना एकदिवसीय आणि टी-२० मालिकेचे सर्व सामने दाखवण्याची परवानगी आहे. तर दोन्ही वाहिन्या पहिल्या कसोटी सामन्याचेही प्रक्षेपण करणार आहेत. मात्र, अखेरच्या तीन कसोटी सामन्यांचे प्रेक्षपण केवळ चॅनल ७ वाहिनी करणार आहे. या तिन्ही सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार कोहली खेळणार नाही. कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. इतकेच नाही, तर तो सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूही आहे. त्यामुळे कोहली अखेरच्या तीन कसोटीत खेळणार नसल्याचा चॅनल ७ वाहिनीला फटका बसणार असून त्यांचे आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

First Published on: November 13, 2020 8:19 PM
Exit mobile version