भारताने आशिया कपमध्ये खेळू नये – वीरेंद्र सेहवाग

भारताने आशिया कपमध्ये खेळू नये – वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवाग

आशिया कप २०१८ मध्ये भारताच्या १८ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर अशा दोन्ही दिवशी सलग मॅचेस ठेवण्यात आल्या आहेत. अशा विचित्र वेळापत्रकामुळे ‘भारताने या कपमध्ये खेळू नये’ असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने दिला आहे. सेहवागने हे विधान ‘इंडिया टीव्ही’शी बोलताना केले आहे. दरवर्षी होणारा आशिया कप यावर्षी यूएई येथे होणार असून यात अफगाणिस्तान, बांग्लादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे पाच संघ सहभाग घेणार आहेत. ज्यात ‘अ’ गटात भारत आणि पाकिस्तान हे संघ असून ‘ब’ गटात बांग्लादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.

आशिया कप २०१८

आशिया कप १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असून पहिल्या दिवशीच सामना बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात होणार असून भारताचा स्पर्धेतील पहिला सामना १८ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. भारत ‘ब’ गटातून जिंकून येणाऱ्या संघाविरूद्ध हा सामना खेळणार आहे. तर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारताला लागोपाठ दोन दिवस ५० ओव्हरचे एकदिवसीय सामने खेळायला लागणार आहेत.

नक्की काय म्हणाला सेहवाग ?

व्यवस्थापनाच्या या विचित्र वेळापत्रकाबद्दल भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने सांगितले की, “मी हे विचित्र वेळापत्रक पाहून थक्क झालो आहे. आजकालच्या क्रिकेटमध्ये कोणता संघ लागोपाठ मॅचेस खेळतो? आजकाल टी-२० सामन्यातही दोन दिवसांचे अंतर असते. अशावेळी दुबईच्या उष्ण वातावरणात सलग दोन दिवस मॅच खेळणे अतिशय अवघड आहे. त्यामुळे हे चुकीचे वेळापत्रक असून भारताने याचा निषेध करत या स्पर्धेत खेळायलाच नको. आशिया कप खेळण्यापेक्षा भारताने आपल्या मालिका सामन्यांवर लक्ष दिले पाहिजे.”

First Published on: July 26, 2018 7:31 PM
Exit mobile version