आयपीएलचे प्रायोजक बदलणार? बीसीसीआय विवोसोबत करार मोडण्याची शक्यता

आयपीएलचे प्रायोजक बदलणार? बीसीसीआय विवोसोबत करार मोडण्याची शक्यता

इंडियन प्रीमियर लीग (IPL) या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेबाबत मागील काही काळात बरीच चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आयपीएल मोसम बीसीसीआयला पुढे ढकलावा लागला होता. मात्र, मागील रविवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पार पडली, ज्यात यंदाचा मोसम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत खेळण्यावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीनंतर चिनी मोबाईल कंपनी ‘विवो’ (VIVO) यंदाही आयपीएलची मुख्य प्रायोजक असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, हा निर्णय जाहीर केल्यानंतर यावर सोशल मीडियावरून बरीच टीका झाली. त्यामुळे बीसीसीआयने विवोसोबतचा करार मोडल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावरून टीका

भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावामुळे चिनी वस्तू आणि अॅप्सवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरत आहे. असे असतानाही बीसीसीआयने विवो कंपनीलाच आयपीएलचे मुख्य प्रायोजक ठेवले होते. यावर सोशल मीडियावरून टीका झाल्यानंतर बीसीसीआयला या निर्णयाचा पुन्हा विचार करणे भाग पडले. नवा मुख्य प्रायोजक मिळणे सध्याच्या परिस्थितीत अवघड जाणार हे माहित असल्याने बीसीसीआयने घाईने कोणताही निर्णय घेणे टाळले. मात्र, विवोसुद्धा हा करार मोडण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे किमान यंदा विवो ही कंपनी आयपीएलची मुख्य प्रायोजक नसणार अशी चर्चा होत आहे. आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व मिळवण्यासाठी विवोने २०१७ मध्ये बीसीसीआयसोबत पाच वर्षांसाठी २१९९ कोटी रुपयांचा करार केला होता.

First Published on: August 4, 2020 8:45 PM
Exit mobile version