आणखी सुनावणीची गरज नाही!

आणखी सुनावणीची गरज नाही!

VVS-Laxman

भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मणला काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे लवाद अधिकारी डी.के.जैन यांनी हितसंबंधाबद्दल नोटीस पाठवली होती. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीवर कार्यरत असतानाही आयपीएल संघ सनरायझर्स हैद्राबादचा मार्गदर्शक म्हणून काम करत असल्यामुळे त्याला ही नोटीस पाठवण्यात आली होती. याचे उत्तर देताना त्याने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीवर जोरदार टीका केली होती. तसेच बीसीसीआयच्या नियमांनुसार तो आपली बाजू मांडण्यासाठी जैन यांच्यासमोर हजरही झाला होता. मात्र, यापुढेही आपल्याकडे सांगण्यासारखे अजून काही नसल्याने आणखी सुनावणीची गरज नाही, असे लक्ष्मणने जैन यांना सूचित केले आहे.

लक्ष्मणसोबतच सचिन तेंडुलकरलाही हितसंबंधाबद्दल नोटीस पाठवण्यात आली होती. या दोघांनीही आधी पत्र लिहून या नोटीसला उत्तर दिले होते आणि मग जैन यांच्यासमोर आपली बाजू मांडली होती. यानंतरची सुनावणी २० मे रोजी होणार असून, यावेळी या दोघांचे वकील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, आपल्याकडे अजून सांगण्यासारखे काही नाही, असे लक्ष्मणने स्पष्ट केले आहे. तसेच त्याने याआधीच सर्व आरोपांचे खंडन केले असून, जर वेळ पडली तर क्रिकेट सल्लागार समितीवरील पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

First Published on: May 16, 2019 4:21 AM
Exit mobile version