सचिनने ‘ती’ बेल वाजवली आणि आजचा सामना सुरू झाला

सचिनने ‘ती’ बेल वाजवली आणि आजचा सामना सुरू झाला

सामन्याची सुरूवात करताना सचिन तेंडुलकर (सौ - व्हिडिओ ग्रॅब)

क्रिकेट पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर पारंपरीक घंटा वाजवून सामन्याची सुरूवात केली जाते, हे आपण पाहिले आहे. ही घंटा वाजवण्यासाठी अनेकदा एखाद्या मोठ्या क्रिकेटर किंवा जगप्रसिद्ध व्यक्तिला आमंत्रित केले जाते. अशी एक प्रथा मुंबईतल्या एका स्टेडियमवरही आहे. ते स्टेडियम म्हणजे ब्रेबॉर्न स्टेडियम. भारत विरुद्ध वेस्ट विंडीज एकदिवसीय मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. सचिनने ब्रेबॉर्न स्टेडियमवरील प्रथेनुसार घंटा वाजवून सामन्याची सुरुवात केली. लॉर्ड्सप्रमाणे ब्रेबॉर्नवरही घंटा वाजवून सामन्याला सुरूवात करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार स्टेडियम प्रशासनाने ही बेल वाजवण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिनला आमंत्रित केले होते. वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत एक कसोटी मालिका खेळवण्यात आली. ही मालिका भारताने जिंकल्यानंतर आता उभय संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

वाचा – भारत-पाक सामना ड्रॉ, पण मनप्रीतच्या ‘या’ हुशारीमुळे कप भारताकडेच!

स्टेडियमवरून झाला होता वाद

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मुंबईत होणारा चौथा एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत येणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर कार्यकारिणी समिती व प्रशासकीय समिती दोन्हीही अस्तित्वात नाही. त्यामुळे कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या कोणी करायच्या, हा प्रश्न मुंबई क्रिकेट असोसिएशनला पडला. कार्यकारिणी समिती व प्रशासकीय समिती नसल्यामुळे एमसीएला या सामन्यासाठी निविदासुद्धा काढता येत नव्हत्या. शिवाय एमसीए सध्या आर्थिक कोंडिचा सामना करत आहे. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यास एमसीए असमर्थ असल्याचे आढलळे. त्यामुळे आर्थिक कोंडीचा सामना करणाऱ्या एमसीएला सामन्याचे यजमानपद गमवावे लागले. त्यानंतर हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात आला होता.

First Published on: October 29, 2018 3:26 PM
Exit mobile version