राहुल कसोटी संघात का नाही?

राहुल कसोटी संघात का नाही?

कपिल देव यांचा सवाल

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात निराशजनक कामगिरी केली. यजमान न्यूझीलंडने हा सामना १० विकेट राखून जिंकत दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. भारताला या सामन्याच्या दोन्ही डावांत दोनशे धावांचा टप्पा पार करता आला नाही. या दोन डावांत मिळून केवळ मयांक अगरवालला अर्धशतक करता आले. अनुभवी रोहित शर्माच्या अनुपस्थितीत युवा पृथ्वी शॉला सलामीची संधी मिळाली. मात्र, त्याला पहिल्या डावात १६ आणि दुसर्‍या डावात १४ धावाच करता आल्या. भारताकडे फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलचा पर्याय उपलब्ध होता. मग त्यांनी राहुलचा कसोटी संघात का समावेश केला नाही, असा प्रश्न भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी उपस्थित केला आहे.

आम्ही जेव्हा खेळत होतो, तेव्हाच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. तुम्ही जेव्हा संघ बांधणी करत असता, तेव्हा तुम्ही खेळाडूंना पाठिंबा देणे गरजेचे आहे. संघात इतके बदल कशासाठी होतात हे मला कळत नाही. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारासाठी (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) वेगवेगळे खेळाडू असले पाहिजेत असे संघ व्यवस्थापनाला वाटते. राहुल चांगल्या फॉर्मात आहे, पण त्याला कसोटी संघात स्थान मिळत नाही. ही गोष्ट मला पटत नाही. फॉर्मात असलेल्या खेळाडूने खेळलेच पाहिजे, असे कपिल देव यांनी स्पष्ट केले. न्यूझीलंड दौर्‍यातील टी-२० मालिकेत राहुलला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर झालेल्या एकदिवसीय मालिकेत त्याने पहिल्या सामन्यात ८८ आणि तिसर्‍या सामन्यात ११२ धावांची खेळी केली होती.

वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतील भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवरही कपिल देव यांनी टीका केली. कसोटी सामना आणि त्याआधी झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांत न्यूझीलंडने उत्कृष्ट कामगिरी केली. कसोटी सामन्याबाबत बोलायचे तर भारताने संघात इतके बदल कशासाठी केले हे मला कळत नाही. प्रत्येक सामन्यात जणू नवा संघ मैदानात दिसतो. तुम्ही जर संघात सतत बदल करत राहिलात, तर खेळाडूंचा आत्मविश्वास कमी होतो. त्यांच्या फॉर्मवरही परिणाम होतो. आपल्याकडे इतके नावाजलेले फलंदाज आहेत. तुम्हाला जर दोन डावांत २०० धावांचा टप्पाही पार करता येत नसेल, तर तुम्हाला परिस्थिती कळलीच नाही. भारताने आता योजना आखण्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे, असे कपिल देव म्हणाले.

राहुलचा कर्नाटक संघात समावेश

बंगालविरुद्ध रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यासाठी लोकेश राहुलची कर्नाटक संघात निवड झाली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्समध्ये होणार्‍या या सामन्याला २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. राहुलच्या समावेशाने कर्नाटक संघ अधिक मजबूत झाला आहे. राहुल सध्या अप्रतिम फॉर्मात असून त्याने टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून मागील दहा डावांत पाच अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. कर्नाटकाने जम्मू आणि काश्मीरचा १६७ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.

First Published on: February 26, 2020 5:14 AM
Exit mobile version