IND vs ENG : सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्याचे कारण काय? माजी क्रिकेटपटूचा सवाल

IND vs ENG : सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्याचे कारण काय? माजी क्रिकेटपटूचा सवाल

सूर्यकुमार यादव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना मंगळवारी पार पडला. इंग्लंडने हा सामना ८ विकेट राखून जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाने घेतलेल्या एका निर्णयावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने जोरदार टीका केली. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी नवखा फलंदाज सूर्यकुमार यादवला भारतीय संघातून वगळण्यात आले. सूर्यकुमारला दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली होती. परंतु, त्याला फलंदाजी मिळाली नाही. मात्र, असे असतानाही त्याला तिसऱ्या सामन्यासाठी संघातून वगळण्यात आले ही बाब गंभीरला फारशी आवडली नाही. सूर्यकुमारला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किमान ३-४ सामने दिले पाहिजे होते, असे गंभीरला वाटते.

सूर्याला पुरेशी संधी दिलेली नाही

टी-२० वर्ल्डकपला आता केवळ सात महिने शिल्लक आहेत. या वर्ल्डकपमध्ये अचानक चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाला दुखापत झाली, तर तुम्ही सूर्यकुमारला संधी देऊ शकता का? सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करू शकतो का, हे तुम्हाला माहीतच नाही. कारण, तुम्ही त्याला पुरेशी संधी दिलेली नाही. त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी किमान ३-४ सामने दिले पाहिजे होते. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी त्याला का वगळण्यात आले हे मला कळले नाही, असे गंभीर म्हणाला.

बदल करण्याची गरजच काय?

भारतीय संघ स्वतःच समस्या निर्माण करत आहे. प्रत्येक सामन्यात संघात बदल करण्याची गरजच काय? इंग्लंडने दुसरा सामना गमावला होता. परंतु, त्यांनी तिसऱ्या सामन्यासाठी फलंदाजीचा क्रम बदलला नाही. भारतानेही खेळाडूंवर विश्वास दाखवणे गरजेचे आहे. भारताकडे प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. मात्र, प्रत्येकाला संधी देण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःसाठी समस्या निर्माण करता. भारताने संघात सतत बदल करणे टाळले पाहिजे, असेही गंभीर म्हणाला.

 

First Published on: March 17, 2021 6:29 PM
Exit mobile version