IPL 2020 Final : नवा विजेता मिळणार की, मुंबई गड राखणार? 

IPL 2020 Final : नवा विजेता मिळणार की, मुंबई गड राखणार? 

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर

गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि सर्वोत्तम संघ का मानला जातो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा यंदाच्या स्पर्धेत आला. मुंबईने यंदा सर्वाधिक साखळी सामने जिंकत अगदी सहजपणे अंतिम फेरी गाठली. मागील वर्षी चौथ्यांदा पटकावलेले जेतेपद यंदा राखण्यासाठी मुंबईसमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने चांगला खेळ करत क्वालिफायर-२ च्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला धूळ चारली आणि पहिल्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली. आता मंगळवारी (आज) होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईचे पाचव्यांदा, तर दिल्लीचे पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य आहे.

मुंबईचे पारडे जड

मुंबई हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आतापर्यंत विक्रमी चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्यांनी यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी करताना १४ पैकी ९ साखळी सामने जिंकत गुणतक्त्यात पहिला क्रमांक पटकावला. तसेच त्यांनी क्वालिफायर-१ च्या सामन्यात दिल्लीचा ५७ धावांनी धुव्वा उडवत अगदी सहजपणे अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे दुबई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यातही मुंबईने पारडे जड मानले जात आहे. मात्र, दिल्लीचा संघ या पराभवाची परतफेड करत पहिल्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यात नक्कीच उत्सुक असेल. त्यामुळे आता अंतिम सामन्यात मुंबईचा संघ पुन्हा एकदा वरचढ ठरणार की, दिल्ली पहिल्यांदा बाजी मारणार? याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

धवनवर दिल्लीची भिस्त

दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त ही कर्णधार अय्यर, शिखर धवन, मार्कस स्टोईनिस, शिमरॉन हेटमायर यांच्यावर असणार आहे. गोलंदाजीत कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्खिया यांनी अप्रतिम कामगिरी केली असून त्यांना अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंची साथ लाभली आहे. मुंबईकडून सूर्यकुमार यादव, ईशान किशन, क्विंटन डी कॉक या फलंदाजांनी सातत्यपूर्ण खेळ केला असून त्यांना किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत चांगली साथ दिली आहे. तर मुंबईच्या गोलंदाजीची भिस्त जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर असेल.

First Published on: November 10, 2020 2:00 AM
Exit mobile version