Wimbledon : फेडरर, जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Wimbledon : फेडरर, जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्टार टेनिसपटूंनी विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविच आणि फेडररला उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतील सामने जिंकण्यात यश आल्यास अंतिम फेरीत हे दोघे आमनेसामने येतील. जोकोविच यंदा सहाव्यांदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला ही स्पर्धा जिंकण्यात यश आल्यास तो फेडरर आणि राफेल नदालच्या २० ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करेल.

जोकोविचची गारीनवर मात  

अव्वल सीडेड जोकोविचने पुरुष एकेरीतील उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चिलीच्या क्रिस्टियन गारीनचा ६-२, ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह जोकोविचने तब्बल ५० व्यांदा एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून या फेरीत त्याचा हंगेरीच्या मार्तोन फुक्सोविक्सशी सामना होईल. फुक्सोविक्स विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा १९४८ नंतर हंगेरीचा पहिलाच टेनिसपटू आहे.

सर्वात वयस्कर खेळाडू

दुसरीकडे ३९ वर्षीय फेडरर विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडररने इटलीच्या लोरेंझो सोनेगोवर ७-५, ६-४, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात करत १८ व्यांदा विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. या फेरीत त्याचा डॅनिल मेदवेदेव्ह आणि हर्बर्ट हुर्काज यांच्यातील विजेत्याशी सामना होईल. मेदवेदेव्ह आणि हुर्काज यांच्यातील उप-उपांत्यपूर्व फेरीचा सामना सोमवारी पावसामुळे थांबवावा लागला होता.

First Published on: July 6, 2021 7:36 PM
Exit mobile version