प्रामाणिक प्रयत्नांमुळेचआम्ही यशस्वी होतोय!

प्रामाणिक प्रयत्नांमुळेचआम्ही यशस्वी होतोय!

कर्णधार कोहली

प्रामाणिक प्रयत्न आणि हेतू या गोष्टींमुळेच आमचा संघ यशस्वी होत आहे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीनंतर व्यक्त केले. भारताने ही मालिका ३-० अशी जिंकली. तसेच कोहलीच्या नेतृत्वात घरच्या मैदानावर भारताचा हा सलग ११ वा कसोटी मालिका विजय होता. भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ५ पैकी ५ सामने जिंकले असून २४० गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत. तसेच कोहलीचा हा संघ जागतिक कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थानावर आहे.

आम्ही जोपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि प्रामाणिक हेतूने खेळत आहोत, तोपर्यंत आम्हाला यश मिळत राहील. आम्हाला आधीपासूनच कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ बनायचे होते. आम्ही जोपर्यंत प्रतिस्पर्ध्यांना झुंज देऊ, तोपर्यंत आमच्यासाठी सकारात्मक गोष्टी होत राहतील. आमचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. ज्या खेळपट्ट्यांवर मदत मिळत नाही, त्या खेळपट्ट्यांवरही आमचे खेळाडू यशस्वी होत आहेत. त्यांच्या या कामगिरीचा मला अभिमान आहे, असे कोहली म्हणाला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामने विशाखापट्टणम, पुणे आणि रांची येथे झाले. या सामन्यांना फारसे प्रेक्षक उपस्थित नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडप्रमाणेच भारतानेही कसोटी सामन्यांसाठी केवळ ५ मैदाने निश्चित केली पाहिजेत, असे कोहलीला वाटते. आपल्याला कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचे असल्यास ही गोष्ट करणे गरजेचे आहे. तुम्ही दरवेळी नवनव्या ठिकाणी सामने ठेवता कामा नये, कारण प्रेक्षक सामन्याला येतील की नाही, याची खात्री नसते. भारतात कसोटी सामन्यांसाठी पाच मैदाने निश्चित ठेवल्यास प्रतिस्पर्धी संघांनांही आपण कुठे खेळणार आहोत याची कल्पना असेल, असे कोहलीने सांगितले.

धोनीबाबत गांगुलीशी चर्चा नाही!

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली लवकरच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहे. त्याला महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. धोनीने इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. मात्र, त्याने अजून निवृत्तीही घेतलेली नाही. धोनीबाबत गांगुलीने माझ्याशी चर्चा केलेली नाही, असे कोहलीने स्पष्ट केले. मी त्याचे (गांगुली) अभिनंदन केले. त्याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणे ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, त्याने अजून धोनीबाबत माझ्याशी चर्चा केलेली नाही. त्याला जेव्हा हवे असेल, तेव्हा तो माझ्याशी संवाद साधेल. तसेच तो सांगेल तेव्हा मी त्याची भेट घेईन, असे कोहली म्हणाला.

First Published on: October 23, 2019 4:15 AM
Exit mobile version