जमुना बोरोची विजयी सुरुवात

जमुना बोरोची विजयी सुरुवात

जमुना बोरो

भारताच्या जमुना बोरोने (५४ किलो) जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेची विजयी सुरुवात केली. तिने मंगोलियाच्या मिचिदमा एर्देनेदलाईचा ५-० असा धुव्वा उडवत या स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जमुनाची जागतिक स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे तिला या सामन्याच्या सुरुवातीला चांगला खेळ करता आला नाही, पण तिने दमदार पुनरागमन करत मिचिदमाला गुण मिळवण्याची संधीही दिली नाही.

२२ वर्षी जमुनाचा पुढील फेरीत अल्जेरियाच्या पाचव्या सीडेड ओईदाद स्फोहशी सामना होईल. ओईदादने २०१७ सालच्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते आणि यंदाच्या स्पर्धेत तिला पहिल्या फेरीत बाय मिळाला.

शनिवारी या स्पर्धेत नीरज (५७ किलो) आणि स्विटी बुरा (७५ किलो) या भारतीय महिला बॉक्सर्सचे सामने होणार आहेत. नीरजसमोर पहिल्या फेरीत चीनच्या क्विओ जिएरुचे, तर बुरासमोर मंगोलियाच्या मुंखबातचे आव्हान असेल. यंदाच्या जागतिक स्पर्धेत ५७ देशांच्या २२४ बॉक्सर्स सहभागी झाल्या आहेत.

First Published on: October 5, 2019 5:44 AM
Exit mobile version