जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सायना आणि किदम्बी श्रीकांतचा पुढच्या फेरीत प्रवेश

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सायना आणि किदम्बी श्रीकांतचा पुढच्या फेरीत प्रवेश

सायना, श्रीकांत

चीनच्या नानजिंगमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या पहिल्या सामन्यात तुर्कीच्या अली डेमीबर्गला पराभूत करत स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे. अली आणि सायना यांच्यातील सामना सुरूवातीपासूनच अतिशय रंगतदार झाला. मात्र अखेर सायनाने २१-१७, २१-८ अशा सरळ सेट्समध्ये अलीचा पराभव करत विजय मिळवला. तर दुसरीकडे किदम्बी श्रीकांतने आयर्लंडच्या नहात न्युगेनचा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे.


अली आणि सायना यांच्या सामन्यात सुरूवातीपासूनच दोन्ही खेळांडू तोडीस तोड खेळ दाखवत सामन्यात विजयासाठी धडपड करताना दिसून येत होते. पहिल्या सेटच्या सुरूवातीला अलीने सायनावर आघाडी घेतली खरी मात्र नंतर सायनाने अप्रतिम कमबॅक करत पहिला सेट २१-१७ च्या फरकाने जिंकला आणि सामन्यात विजयी आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा एकदा दोघींकडून सुंदर खेळ पाहायला मिळाला मात्र सायनाने आपला खेळ उंचावत अखेर २१-८ च्या फरकाने सामन्यात विजय मिळवला. तर श्रीकांतने आयर्लंडच्या नहात न्युगेनला २१-१५, २१-१६ अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभूत करत विजयी सलामी दिली आहे. श्रीकांत आणि नहात यांच्यातील सामना अवघा ३७ मिनीट चालला ज्यात श्रीकांतने नहात वर सहज विजय मिळवत स्पर्धेत दुसरी फेरी गाठली आहे.


जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशीपासून भारतीय खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला आहे. पहिल्या दिवशी एच. एस. प्रणॉय आणि समीर वर्माच्या विजयानंतर आता भारताकडून सायना आणि किदम्बी श्रीकांतने विजय मिळवत भारताची विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.

First Published on: July 31, 2018 6:07 PM
Exit mobile version