जागतिक चॅम्पियनशिपमुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढेल!

जागतिक चॅम्पियनशिपमुळे कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढेल!

Geoff Allerdice

एकदिवसीय आणि खासकरून टी-२० क्रिकेटच्या उदयामुळे मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेटची लोकप्रियता फार कमी झाली आहे. ५ दिवस चालणार्‍या कसोटी क्रिकेटपेक्षा अगदी काही तास चालणार्‍या मर्यादित षटकांच्या क्रिकेटला चाहते आणि खेळाडूही पसंती देत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कसोटी क्रिकेटकडे पुन्हा चाहत्यांनी वळावे यासाठी आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेला १ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेपासून सुरुवात होणार असून ती जून २०२१ पर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक कसोटी सामन्यात आणि मालिकेत गुण मिळणार आहेत. त्यामुळे आपोपच कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढणार आहे, असे विधान आयसीसीचे महाव्यवस्थापक जेफ अ‍ॅलर्डाइस यांनी केले.

विराट कोहलीसारख्या खेळाडूंनी या स्पर्धेला याआधीच पाठिंबा दर्शवला आहे. खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळायला आवडते हे मला ठाऊक आहे. आता पहिल्यांदा कसोटी क्रिकेटच्या सर्व सामन्यांमध्ये गुण मिळणार असल्याने या सामन्यांचे महत्त्व वाढणार आहे. या स्पर्धेत कोणताही संघ केवळ एका मालिकेवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. याआधी जागतिक क्रमवारीमुळे सर्वोत्तम कसोटी संघ कोणता हे कळायला मदत व्हायची, पण आता संघाना गुण मिळवायचे आहेत ते जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी. त्यामुळे कसोटी सामने पुन्हा एकदा रंगतदार होतील आणि चाहते आपला संघ सोडून इतर संघांचेही सामने पाहतील याची मला खात्री आहे. तसेच आता खेळाडू क्रमांक आणि आपले नाव असणारी जर्सी परिधान करणार असल्याने लहान मुलेही कसोटी क्रिकेटकडे आकर्षित होतील. लहान मुलांना आपल्या आवडत्या खेळाडूंचे नाव असलेली जर्सी घालून मैदानात यायला आवडते, असे जेफ अ‍ॅलर्डाइस म्हणाले.

First Published on: July 29, 2019 4:16 AM
Exit mobile version