वृद्धिमान साहाचे अर्धशतक; भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ सराव सामना अनिर्णित

वृद्धिमान साहाचे अर्धशतक; भारत-ऑस्ट्रेलिया ‘अ’ सराव सामना अनिर्णित

वृद्धिमान साहा

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या सराव सामन्याच्या अखेरच्या दिवशी नाबाद अर्धशतकी खेळी केली. भारताच्या इतर फलंदाजांना मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील पहिला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे (नाबाद ११७) भारताने पहिला डाव ९ बाद २४७ धावांवर घोषित केला होता. याचे उत्तर देताना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने ९ बाद ३०६ धावांवर आपला डाव घोषित करत पहिल्या डावात ५९ धावांची आघाडी मिळवली. त्यांच्याकडून कॅमरुन ग्रीनने नाबाद १२५ धावांची खेळी केली, तर भारताच्या उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने ३-३ विकेट घेतल्या.

भारताने दुसरा डाव ९ बाद १८९ धावांवर घोषित केला. सलामीवीर पृथ्वी शॉ (१९) आणि शुभमन गिल (२९) यांनी भारताच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र, या दोघांनाही कॅमरुन ग्रीनने माघारी पाठवले. चेतेश्वर पुजारा खातेही न उघडता बाद झाला. यानंतर हनुमा विहारी (२८) आणि कर्णधार रहाणे (२८) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. हे दोघे बाद झाल्यावर साहाने एक बाजू लावून धरत १०० चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी केली. त्याच्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताने दुसरा डाव १८९ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघापुढे सामना जिंकण्यासाठी १३१ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना दिवसअखेर त्यांना १ बाद ५२ धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.

First Published on: December 8, 2020 8:03 PM
Exit mobile version