WTC Final : ‘फायनल हा एकच सामना असतो’; बेस्ट ऑफ थ्रीवरून वॉनने कोहलीला सुनावले

WTC Final : ‘फायनल हा एकच सामना असतो’; बेस्ट ऑफ थ्रीवरून वॉनने कोहलीला सुनावले

बेस्ट ऑफ थ्रीवरून मायकल वॉनने कोहलीला सुनावले

न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. भारताने मागील दोन वर्षांत दमदार कामगिरी करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. परंतु, साऊथहॅम्पटन येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघ चांगला खेळ करू शकला नाही. याचा फायदा घेत न्यूझीलंड पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. परंतु, ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी ही ‘बेस्ट ऑफ थ्री’ असली पाहिजे.जगातील सर्वोत्तम कसोटी संघ केवळ एका सामन्याच्या निकालावर ठरण्याला माझी सहमती नाही,’ असे अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. मात्र, ही गोष्ट इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनला फारशी आवडली नाही. त्याने ट्विटरवरून कोहलीला सुनावले.

आयपीएल दोन आठवड्यांनी कमी करणार का?

क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकात तीन सामन्यांची अंतिम फेरी खेळवण्यासाठी वेळ कुठे आहे? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ज्यावर्षी असेल, त्यावर्षी आयपीएल स्पर्धा दोन आठवड्यांनी कमी करणार का? मला नाही वाटत. फायनल हा एकच सामना असतो. एकच सामना असल्याने आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार हे संघ/खेळाडूंना ठाऊक असते. त्यामुळे अंतिम सामन्याला इतके महत्त्व असते, असे वॉन त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

कोहली काय म्हणाला होता?

न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना गमावल्यावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी ही ‘बेस्ट ऑफ थ्री’ असली पाहिजे, असे मत कोहलीने व्यक्त केले होते. जगातील सर्वोत्तम कसोटी संघ केवळ एका सामन्याच्या निकालावर ठरण्याला माझी सहमती नाही. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत तुम्हाला संघांची खरी गुणवत्ता कळते. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या संघामध्ये पुनरागमन करण्याची क्षमता आहे का? किंवा पहिल्या सामन्यातील विजेता संघ दमदार कामगिरी सुरु ठेवत ही मालिका जिंकतो का? हे पाहणे चुरशीचे ठरते, असे कोहली म्हणाला होता.

First Published on: June 26, 2021 3:55 PM
Exit mobile version