WTC Final : न्यूझीलंडचे पारडे जड; अंतिम सामन्याबाबत माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे मत

WTC Final : न्यूझीलंडचे पारडे जड; अंतिम सामन्याबाबत माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे मत

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते. याचा न्यूझीलंडचे गोलंदाज भारतीय गोलंदाजांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतील. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बहुधा न्यूझीलंडचे पारडे जड आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने व्यक्त केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत असून भारतीय संघ नुकताच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. या गोष्टीचाही न्यूझीलंडला फायदा होऊ शकेल, असे ब्रेट लीला वाटते.

गोलंदाजी ठरेल संघांमधील फरक

भारत आणि न्यूझीलंड हे दोन तुल्यबळ संघ आहेत. मात्र, न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील परिस्थितीमध्ये फारसा फरक नाही. न्यूझीलंडप्रमाणेच इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाज आणि स्विंग गोलंदाजांना मदत मिळते. या गोष्टीचा न्यूझीलंडला फायदा होऊ शकेल. त्यामुळे अंतिम सामन्यात बहुधा न्यूझीलंडचे पारडे जड आहे. दोन्ही संघांतील फलंदाजांमध्ये स्विंगविरुद्ध धावा करण्याची क्षमता आहे. परंतु, अंतिम सामन्यात गोलंदाजी हा दोन संघांमधील मुख्य फरक असेल. जो संघ सर्वोत्तम गोलंदाजी करेल, विजेता ठरेल, असे ली म्हणाला.

कोहली-विल्यमसन द्वंद्वासाठी उत्सुक

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांची नेतृत्वशैली पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात या दोन कर्णधारांमधील द्वंद्व पाहताना मजा येईल, असे लीला वाटते. केन खूप शांत आणि संयमी आहे. मात्र, कोणत्या परिस्थितीत, काय निर्णय घेतला पाहिजे हे त्याला ठाऊक आहे. याऊलट विराट हा खूप आक्रमक कर्णधार आहे. त्यामुळे मी या दोघांमधील द्वंद्व पाहण्यास उत्सुक आहे. मी यापूर्वी आक्रमक आणि संयमी अशा दोन्ही प्रकारच्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो आहे. त्यामुळे कोणाचीही शैली चूक किंवा बरोबर नसते, असे लीने नमूद केले.

First Published on: June 4, 2021 7:06 PM
Exit mobile version