WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोणाचे पारडे जड? सचिन तेंडुलकरने दिले उत्तर

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोणाचे पारडे जड? सचिन तेंडुलकरने दिले उत्तर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला आता केवळ दोन दिवस शिल्लक आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे होणार आहे. न्यूझीलंडच्या संघात केन विल्यमसन, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी यांसारखे खेळाडू असून हा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे भारताच्या संघात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह असे मॅचविनर खेळाडू असून हा संघ सध्या जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना नक्की कोणता संघ जिंकणार हे सांगणे अवघड असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. परंतु, न्यूझीलंडने नुकतेच दोन कसोटी सामने खेळल्याने त्यांचे पारडे जड असल्याचे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला वाटते.

पुरेसा सराव मिळाला आहे

भारत आणि न्यूझीलंड यांची गोलंदाजांची फळी तुल्यबळ आहे. दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट फलंदाज आहेत. परंतु, न्यूझीलंडने अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले. त्यामुळे त्यांना पुरेसा सराव मिळाला आहे आणि ही गोष्ट त्यांना फायदेशीर ठरू शकेल. याच कारणाने, अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे पारडे थोडे जड असल्याचे आपण म्हणू शकतो, असे सचिन म्हणाला.

भारतीय संघ बॅकफूटवर नाही

न्यूझीलंडला चांगला सराव मिळालेला असला, तरी भारतीय संघ बॅकफूटवर नसल्याचेही सचिनने स्पष्ट केले. कोरोनामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. परंतु, भारतीय संघाला जे काही शक्य होते, ते त्यांनी केले. त्यामुळे भारताने पुढचा विचार करणे गरजेचे आहे. आपले खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्टया अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे तयार असतील याची मला खात्री आहे, असेही सचिन म्हणाला.

First Published on: June 16, 2021 4:35 PM
Exit mobile version