खोटे आरोप करून मला बदमान करण्याचा प्रयत्न; महिला क्रिकेट संघाच्या माजी प्रशिक्षकांचे बीसीसीआयला पत्र 

खोटे आरोप करून मला बदमान करण्याचा प्रयत्न; महिला क्रिकेट संघाच्या माजी प्रशिक्षकांचे बीसीसीआयला पत्र 

भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमण यांचे बीसीसीआयला पत्र

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा वाद चिघळताना दिसत आहे. गुरुवारी डब्ल्यूव्ही रमण यांच्या जागी रमेश पोवारची महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली. पोवार आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज यांच्यात दोन वर्षांपूर्वी वाद झाले होते. त्यामुळे पोवारला प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले होते. त्यातच रमण यांच्या मार्गदर्शनात मागील वर्षी भारताने महिला टी-२० वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) त्यांच्या जागी पोवारची पुन्हा प्रशिक्षकपदासाठी शिफारस केल्याने ही निवड वादग्रस्त ठरत आहे. आता रमण यांनी बीसीसीआयला पत्र लिहीत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायची तयारी

मी प्रशिक्षक म्हणून कशाप्रकारे काम करतो, याबाबत बहुधा तुम्हाला वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या या माहितीचा माझ्या उमेदवारीवर काही फरक पडला का, हे मला माहित नाही. परंतु, काही लोकांकडून माझ्यावर खोटेनाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे थांबणे गरजेचे आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायची माझी तयारी आहे, असे रमण त्यांच्या पत्रात म्हणाले. त्यांनी हे पत्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अध्यक्ष राहुल द्रविडलाही पाठवले आहे.

नेमणूक न होण्याला इतर काही कारणे

मी प्रशिक्षक म्हणून असक्षम असल्याने माझी पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली नसेल तर ते समजण्यासारखे आहे. परंतु, माझी प्रशिक्षकपदी नेमणूक न होण्याला इतर काही कारणे असण्याची शक्यता आहे. काही खेळाडू ज्या संघाच्या यशापेक्षा स्वतःच्या कामगिरीला महत्व देतात, त्यांनी माझ्यावर काही आरोप केले आहेत. त्यांच्या खोट्या आरोपांमुळे माझी पुन्हा प्रशिक्षकपदी निवड झाली नसेल, तर हा चिंतेचा विषय आहे, असेही रमण त्यांच्या म्हणाले.

First Published on: May 15, 2021 5:18 PM
Exit mobile version