युवा खेळाडूंना स्मिथ, वॉर्नरची उणीव भासत आहे

युवा खेळाडूंना स्मिथ, वॉर्नरची उणीव भासत आहे

जॉश हेझलवूडचे मत

मागील वर्षी मार्चमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध केप टाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या दोन प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. खासकरून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दबावात चांगला खेळ करण्यात वारंवार अपयश आले आहे. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर या अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनची युवा खेळाडूंना कमी जाणवत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार जॉश हेझलवूडने व्यक्त केले आहे.

जेव्हा तुमच्या संघात युवा फलंदाज असतात, तेव्हा त्यांच्यासोबत अनुभवी फलंदाज असणे गरजेचे असते. प्रशिक्षकही तुम्हाला काही गोष्टी शिकवू शकत नाहीत. तुम्हाला खेळपट्टीवर वेळ घालवूनच काही गोष्टी शिकता येतात. फलंदाजी करताना तुमच्यासोबत दुसर्‍या बाजूला अनुभवी फलंदाज असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे ते दोघे (स्मिथ आणि वॉर्नर) संघात परत आले, तर इतर फलंदाजांचाही खेळ सुधारेल. मार्कस हॅरिस, ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लबूसचेंग हे सर्व खेळाडू कसोटी संघात नवे आहेत. ते फलंदाजी करत असताना त्यांच्यासोबत अनुभवी फलंदाज नसल्याने त्यांना मोठ्या धावा करण्यात अपयश येत आहे, असे हेझलवूड म्हणाला.

स्मिथ आणि वॉर्नरवरील बंदीचा कालावधी २९ मार्चला संपणार आहे. बंदीचा कालावधी संपताच त्यांची ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड होण्याची शक्यता आहे.

First Published on: February 20, 2019 4:58 AM
Exit mobile version