ICC ODI Rankings : चहलची आठव्या स्थानी झेप

ICC ODI Rankings : चहलची आठव्या स्थानी झेप

युझवेन्द्र चहल

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-१ अशी जिंकली. या मालिकेत भारताचा लेगस्पिनर युझवेन्द्र चहलला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याला या मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले होते. मात्र तरीही त्याने आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल दहा गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. चहलने गोलंदाजांच्या क्रमवारीत आठव्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ६८३ गुण जमा आहेत. तर भारताच्याच जसप्रीत बुमराहने क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

कोहली अव्वल स्थानी कायम

फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे. कोहलीने विंडीजविरुद्धच्या मालिकेत विक्रमी कामगिरी केली होती. त्याने या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांत शतक झळकावले होते. तसेच त्याने या मालिकेत केलेल्या ४५३ धावा या भारतीय फलंदाजाने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने आपल्या खात्यात १५ गुणांची भर घातली. सध्या त्याच्या खात्यात ८९९ गुण जमा आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या रोहित शर्माच्या खात्यात ८७१ गुण जमा आहेत. रोहितने विंडीजविरुद्धच्या मालिकेत दोन शतके झळकावली होती. त्यामुळे त्याने आपल्या खात्यात २९ गुणांची भर घातली.

धवनची घसरण

शिखर धवनला मात्र विंडीजविरुद्धच्या मालिकेत चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्याने या मालिकेच्या पाच सामन्यांत अवघ्या ११२ धावा केल्या. त्यामुळे त्याची क्रमवारीत घसरण झाली आहे. तो पाचव्या स्थानावरून नवव्या स्थानी पोहोचला आहे.
First Published on: November 2, 2018 11:09 PM
Exit mobile version