PUBG चे व्यसन; त्याने चक्क घरदार आणि गर्भवती पत्नीलाही सोडले

PUBG चे व्यसन; त्याने चक्क घरदार आणि गर्भवती पत्नीलाही सोडले

पब्जी गेम

सध्या PubG या खेळाने सर्वांचीच झोप उडवलेली आहे. हा गेम खेळणारे तहान-भूक विसरून मोबाईल स्क्रिनमध्ये घुसले आहेत. तर त्यांच्या चिंतेने त्यांचे पालक डोक्याला हात लावून बसले आहेत. पब्जीच्या व्यसनाचे अनेक धक्कादायक परिणाम आता समोर यायला लागले आहेत. मलेशियामध्ये एका महाभागाने चक्क पब्जी खेळण्यासाठी आपल्या चार महिन्यांच्या गर्भवती महिलेला वाऱ्यावर सोडले आहे. पब्जी खेळत असताना बायको सतत ओरडत असते, त्यामुळे पतीने एकेदिवशी घरच सोडून दिले. मागच्या एक महिन्यापासून तो घरीच परतलेला नाही. अखेर पत्नीने एक फेसबुक पोस्ट लिहून आपल्या व्यथा मांडल्यानंतर ही घटना उजेडात आली.

प्रकरण काय आहे

‘World of Buzz’ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार मलेशिया मधील एका व्यक्तीला त्याच्या भावाने पब्जी गेमची ओळख करुन दिली. त्यानंतर रात्रंदिवस पब्जी खेळू लागला. त्याच्या या सततच्या खेळामुळे घरातील दैनंदिन कामाकडेही त्याचे दुर्लक्ष होऊ लागले होते. दिवसा आणि रात्री देखील तो पब्जी खेळण्यातच घालवत होता. त्यामुळे त्याची पत्नी आणि पालक त्याला ओरडू लागले. आपली पत्नी आणि पालक शांतपणे पब्जी खेळून देत नाहीत, म्हणून एकेदिवशी त्याने घरच सोडले. तब्बल एक महिना उलटूनही तो घरी आलेला नाही.

हे वाचा – ‘पबजी’ गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम 

पत्नीने फेसबुक पोस्ट लिहून आपल्याला भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्यात ती म्हणते, “तो आम्हाला एका महिन्यापूर्वी सोडून गेला. आता आमच्याकडे कोणताही पर्याय नाही. पब्जी खेळण्याआधी त्याचे व्यक्तिमत्व सहनशील असे होते. मात्र चार वर्षांपूर्वी त्याने ऑनलाईन गेम खेळण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून परिस्थिती बिघडतच गेली. तो लवकरात लवकर घरी येण्यासाठी कृपया सर्वांनी प्रार्थना करावी.” मात्र पतीने पब्जीमुळेच घर सोडले की काही वेगळे कारण आहे? याबाबत मात्र अजूनही खात्री झालेली नाही.

मात्र पब्जीच्या व्यसनामुळे घर सोडल्याची ही पहिलीच घटना नाही. जगभरात पब्जीमुळे अनेक युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, पब्जी हा गेम लाखो लोक खेळत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका मुलाने आत्महत्या केली होती. कारण त्याच्या पालकाने पब्जी खेळण्यासाठी त्याला चांगला मोबाईल घेऊन दिला नव्हता. तर नाशिकमध्ये एका युवकाने पब्जी खेळण्यासाठी चक्क घर सोडले आणि वेटरची नोकरी करणे पसंत केले आहे.

दरम्यान भारतात काही राज्य सरकार आणि संस्था पब्जीचा विळखा सैल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गुजरात सरकारने एक नोटीस काढून सर्व प्राथमिक शाळांमध्ये पब्जी खेळण्यावर बंदी आणली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत जाहीर कार्यक्रमात चिंता व्यक्त केली होती. तसेच पालकांनी या प्रश्नाला कसे हाताळावे, हे देखील मोदी यांनी सांगितले होते.


 

हे ही वाचा – ‘पबजी’ खेळण्यासाठी तरुणाची आत्महत्या
First Published on: February 11, 2019 4:39 PM
Exit mobile version