ठाण्यात ४०७ कुटुंब अतिधोकादायक परिस्थितीत 

ठाण्यात ४०७ कुटुंब अतिधोकादायक परिस्थितीत 
 पावसाळ्यापूर्वी महापालिका आपल्या कार्यक्षेत्रातील धोकादायक असो या अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. त्यामधील ७४ अतिधोकादायक इमारतीपैकी २९ इमारती रिकाम्या करण्यात आणि २ इमारती जमीनदोस्त करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. मात्र उर्वरित ४३ इमारतींवर अद्यापही कारवाई झाली नसल्याने तेथील ४०७ कुटुंब एकदा घर सोडले तर घराचा ताबा जाऊ शकतो अशी भितीने धोकादायकच नाहीतर अतिधोकादायक अवस्थेत संसाराचा गाडा हाकत आहेत. मुंबईतील इमारत दुर्घटनेनंतर ठाण्यातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यास महापालिकेने चांगलीच कंबर कसली आहे.
ठाणे महापालिकेने प्रभाग निहाय शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी दरवर्षीप्रमाणे यंदाही तयार केली आहे. त्यामध्ये शहरात ७४ इमारती या अतिधोकादायक तर धोकादायक इमारतींमध्ये ४ हजार ३३० इमारतींचा समावेश आहे. त्यातील काही इमारती या दुरुस्त होऊ शकणाऱ्या असल्याने त्याची परवानगी पालिकेने दिलेली आहे.
मात्र पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करुन त्यातील महापालिका शाळांमध्ये तात्पुरता निवारा देण्याची पालिकेची तयारी केली आहे.  त्यासाठी महापालिकेने यंदा ११६ शाळा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबईत झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अतिधोकादायक इमारतींमधील उर्वरित असलेल्या ४३  इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातही या इमारतींमध्ये आजच्या घडीला ४०७ कुटुंबांचे वास्तव्य असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कोपरीत १६ इमारती
उर्वरित अतिधोकादायक इमारतींमध्ये ११ इमारती या तळ मजल्याच्या आहे. १७ इमारती या तळ अधिक एक मजल्याच्या आहेत. तर कोपरीतील १६ इमारतींमध्ये १८७ कुटुंबाचे वास्तव्य आहे.” या इमारत धारकांना इमारती रिकामी करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच ही मोहीम लवकरच आणखी तीव्र केली जाईल.”
–  गजानन गोदापुरे ,उपायुक्त, अतिक्रमण विभाग,ठामपा.
First Published on: July 11, 2022 9:46 PM
Exit mobile version