कचरा उचलणारे ४८० कामगार लसीकरणापासून वंचित !

कचरा उचलणारे ४८० कामगार लसीकरणापासून वंचित !

Covaxin लसीचे दोन डोस symptomatic कोरोना रुग्णांवर ५० टक्के प्रभावी, संशोधन अहवाल

उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत घरोघरी- गल्लीबोळात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून कचरा उचलणाऱ्या कोणार्क इन्व्हायरो कंपनीच्या ४८० कंत्राटी कामगारांना अद्याप लसीकरण पासून मनपा प्रशासनाने वंचित ठेवले आहे. मनपा प्रशासनाने या कामगारांना ” फ्रंट लाईन वर्कर्स” घोषित करून लसीकरण केले पाहिजे मात्र मनपा प्रशासन आणि कोणार्क कंपनीला वारंवार विनंती करूनही ते कामगारांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप लढा या कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी केला आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेने कोणार्क इन्व्हायरो या खाजगी कंपनीला कचरा उचलण्याचा कंत्राट दिला आहे .कचरा उचलण्याचे व त्याची विल्हेवाट लावण्याचे प्रतिदिन ४ लाख ५० हजार रुपये मनपाला या कंपनीला द्यावे लागतात. अवघ्या १४ वर्ग कि.मी असलेल्या शहराची लोकसंख्या जवळपास ८ लाख असून  देशात सर्वाधिक लोकसंख्याची घनता असलेल्या शहरांमध्ये उल्हासनगर शहर समाविष्ट आहे. घरगुती व दुकानातील कचऱ्याशिवाय  तयार कपडे, जीन्स, फर्निचरच्या बाजारपेठा ,हॉटेल्स , मॉल , लघुउद्योग, कारखाने, भंगारची गोडाऊन यामुळे शहरात रोज साधारणतः ३५० टन कचरा निर्मिती होत असते. घरोघरी, दुकानांत, कारखान्यांत, बाजारपेठेत रस्त्यात असलेला कचरा उचलणे व तो घंटागाडीत ठेवणे , त्याची डंपिंग ग्राऊंडवर विल्हेवाट याची जबाबदारी कोणार्क कंपनीच्या ४८० कामगारांवर आहे. रोज हे कामगार हजारो लोकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे कोव्हीडच्या संसर्गाबाबत  या कामगारांचा व त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

महानगरपालिका प्रशासनाने ज्याप्रमाणे त्यांचे कर्मचारी अधिकारी यांना “फ्रंटलाईन वर्कर्सचा ” दर्जा देऊन त्यांच्या लसीकरण बाबत प्राथमिकता दिली आहे त्याप्रमाणे कोणार्कच्या सफाई कामगारांच्या बाबतीत दक्षता घेणे गरजेचे होते. मात्र उल्हासनगर मनपा प्रशासन आणि कोणार्क कंपनीने लसीकरण बाबत उदासिन आहे. या कंपनीचे बरेचसे सफाई कर्मचारी आदिवासी व दुर्गम भागातून येतात त्यांना उल्हासनगर महानगरपालिकेने ओळखपत्रे न दिल्याने रेल्वे किंवा बस प्रवास करतांना बऱ्याचशा अडचणी येतात काहींना दंड आकारणी सुद्धा करण्यात आली आहे . अन्य महानगरपालिकांनी कंत्राटी कामगारांना संबंधित महानगरपालिकांचे कंत्राटी कामगार म्हणून ओळखपत्रे सुद्धा दिलेली आहेत त्यामुळे कंत्राटी कामगारांचे लसीकरण व ओळखपत्रे मिळावी अशी मागणी लढा या कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी महापौर लीलाबाई आशन व आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे  .

कोणार्कच्या सफाई कामगारांची लसीकरणसाठी एक यादी मुख्य आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांना देण्यात आली आहे, हिवरे यांनी ती यादी मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांना दिली आहे,पगारे यांनी आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करून तातडीने लसीकरण बाबत निर्णय घ्यायला हवा होता मात्र प्रशासन ना केवळ कामगारांच्या जीवाशी तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी देखील खेळत आहे.
-संदीप गायकवाड, अध्यक्ष,  लढा कामगार संघटना

आमच्या कामगारांचे त्वरित लसीकरण करण्यात यावे अशी मागणी आम्ही मनपा प्रशासनाला केली आहे. ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या काही कामगारांचे लसीकरण झाले आहे मात्र उर्वरीत कामगारांचे लसीकरणबाबत आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की विशेष बाब म्हणून या गोष्टीकडे लक्ष देऊन कामगारांसाठी स्वतंत्र शिबीर आयोजित करावे-
-राजेश वधारिया, संचालक, कोणार्क इन्व्हायरो

या संदर्भात संबंधित कंपनीने त्यांच्या कामगारांची यादी मनपा आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना सादर करावी या यादीची छाननी करून योग्य तो निर्देश आयुक्त देतील त्याप्रमाणे लसीकरण करण्यात येईल. कंत्राटी कामगारांचे ओळखपत्रे बनविण्याची जबाबदारी त्यांच्या कंपनीची असते.
– डॉ युवराज भदाणे,  जनसंपर्क अधिकारी उल्हासनगर मनपा

First Published on: May 14, 2021 10:46 PM
Exit mobile version