वाहतूक पोलिसाला कारने फरफटत नेले

वाहतूक पोलिसाला कारने फरफटत नेले

प्रातिनिधिक फोटो

अनेकदा वाहनचालक वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालतात,अरेरावी करतात. एकंदरीत अनेक वाहनचालक वाहतूक पोलिसांना जुमानत नसल्याच्या अनेक घटना घडत असतात. बुधवारी सायंकाळी डोंबिवलीतील टंडन रोडवर भरधाव वेगातील कार थांबविणार्‍या वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली.

डोंबिवली पूर्वेतील टंडन रोडवर वाहतूक पोलीस नेहमीच कार्यरत असतात.नियमांचे पालन न करणार्‍या वाहनांवर याच वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. वाहतूक पोलीस कर्मचारी बाळासाहेब होरे (45) यांच्यासोबत वाहतूक वार्डन दिनकर सोमासे असे दोघे बुधवारी सायंकाळी आपली ड्युटी करीत होते. त्यावेळी टंडन रोडवर एक भरधाव वेगातील कार येताना दिसली असता रस्त्यामध्ये जावून पोलीस कर्मचारी बाळासाहेब होरे यांनी त्या कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे कार थांबेल अशी त्यांची अपेक्षा होती,मात्र कारचालकाने चकवा देण्याचा प्रयत्न करीत कारचा वेग वाढविला.

त्यामुळे पोलीस कर्मचारी होरे यांनी कारच्या बोनेटला आणि वायपरला धरले होते. मात्र तरीही कार चालकाने गाडी न थांबविता पुढे वेगाने नेली. काही मिनिटे हा थरार टंडन रोड आणि चिपळूणकर रोडवर सुरु होता. यामध्ये पोलीस कर्मचारी होरे किरकोळ जखमी झाले. पोलीस कर्मचारी होरे यांना एक कार फरफटत नेत असतानाच वाहतूक वार्डन सोमासे यांनी आपल्या मोबाईल मध्ये ती घटना कैद केली तसेच लागलीच या घटनेची माहिती वाहतूक शाखा आणि डोंबिवली पोलिसांना दिली. पोलिसांनी कारच्या नंबरवरून भोपर येथून एका अल्पवयीन कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First Published on: July 14, 2022 8:40 PM
Exit mobile version