ठाणेकर नागरिकांनो सावधान, कोरोनाने केले डोकेवर

ठाणेकर नागरिकांनो सावधान, कोरोनाने केले डोकेवर

कोरोना वाढवतोय चिंता 24 तासांत राज्यात 1115 नवीन कोरोना रुग्ण तर 9 जणांचा मृत्यू

शनिवार आणि सोमवारनंतर पुन्हा एकदा बुधवारी ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने उसळली घेतली आहे. आजच्या दिवसभरात जिल्ह्यात तब्बल २४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १४ रुग्ण हे ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात नोंदवले गेले आहेत. तर आठवड्यात वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे आता सक्रिय रुग्णांचा आकडा शंभराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. तर निम्म्याहून अधिक सक्रिय रुग्ण ठामपा हद्दीत उपचारार्थ दाखल आहेत. त्यामुळे जपून जपून जा रे पुढे धोका है ! असेच म्हणावे लागणार आहे. शनिवारी (११ मार्च) जिल्ह्यात १६ रुग्ण तर सोमवारी (१३ मार्च) १३ रुग्ण नोंदवले गेले. त्यानंतर बुधवारी (१५ मार्च) २४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येने सक्रिय रुग्णांची संख्या ही चांगलीच वाढली आहे. ती संख्या आता ९८ इतकी झाली आहे. ठामपा हद्दीत १४ नोंदवलेल्या नव्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्ण संख्या ५८ वर गेली आहे. म्हणजे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण ठामपा हद्दीत असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

कल्याण डोंबिवली येथे एक रुग्ण सापडला असून सक्रिय रुग्णांची संख्या ८ झाली आहे. नवी मुंबईत ३ रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्ण संख्या १० इतकी झाली आहे. उल्हासनगर येथे एक रुग्ण नोंदवला गेला असून सक्रिय रुग्ण संख्या ४ झाली आहे. भिवंडी जरी रुग्ण आढळून आला नसला तरी सक्रिय रुग्ण संख्या २ आहे. मीरा भाईंदर येथे एक रुग्ण सापडला असून सक्रिय रुग्ण संख्या ३ झाली आहे. कुळगाव बदलापूर मध्ये नोंदवलेल्या एक रुग्ण संख्या सक्रीय रुग्ण ही एकच आहे.मात्र ठाणे ग्रामीण मध्ये तीन रुग्ण सापडल्याने सक्रिय रुग्ण ही १२ इतकी झाली आहे अशी माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. रुग्ण संख्या वाढत असल्याने ठाणे कर नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचा कटाक्षाने पालन करावे असे आवाहन ही केले जात आहे.

First Published on: March 15, 2023 10:48 PM
Exit mobile version