लालपरी ठरतेय महिलांना प्रवासासाठी ‘लय’भारीच

लालपरी ठरतेय महिलांना प्रवासासाठी ‘लय’भारीच

राज्य सरकारने महिलांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस ( लालपरी) मधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत जाहीर केली. त्यानंतर हीच लालपरी महिलांना सुखकर आणि आरामदायी प्रवासासाठी एक हक्काची अशी ‘लय’भारी प्रवासी वाहन ठरताना दिसू लागली आहे. ठाणे विभागाच्या लालपरींमधून मे महिन्यात ठाणे जिल्ह्यामधील तब्बल सात लाख ३८ हजार ४४८ महिलांनी प्रवास केला आहे. तर सरासरी प्रति दिनी ५२ हजार ७४६ प्रवासी महिलांच्या पसंतीला लालपरीच उतरताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागांतर्गत एकूण आठ आगार येतात. त्या आठ आगारातून धावणाऱ्या एसटी बसेस (लालपरी) या लांब, मध्यम आणि शहरी-ग्रामीण भागात धावत आहेत. याच लालपरीतून १ ते १४ मे २०२३ दरम्यान सात लाख ३८ हजार ४४८ प्रवासी महिलांनी सुखकर आणि आरामदायी प्रवासाचा मनमुराद आनंद लुटला आहे. यातून ठाणे विभागाच्या तिजोरीत ३ कोटी ६ लाख २५ हजार इतका उत्पन्न जमा झाला आहे. तर तितके उत्पन्न शासन योजनेतून महामंडळाला मिळणार आहे. तसेच, त्या एकूण प्रवासी संख्येच्या सरासरी प्रति दिनी विचार केला तर ५२ हजार ७४६ प्रवासी महिलांनी प्रवास केला आहे. महिलांना प्रवासासाठी ऑनलाईन तिकीट आरक्षणाची व्यवस्था केलेली असून जास्तीतजास्त महिलांनी एसटीने प्रवास करावा, असे आवाहन ही महामंडळाकडून करण्यात आले आहे.

याचदरम्यान अमृत महोत्सव वर्षी ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाची सवलत शासनाने जाहीर केली आहे. त्यानुसारच १ ते १४ मे या कालावधीत ७२ हजार ५०५ ज्येष्ठ नागरिकांनी लालपरीमधून प्रवासाचा आनंद लुटला आहे. तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्क्यांची सवलत घोषित केली आहे. त्यातच या १४ दिवसात ७० हजार ५२७ ज्येष्ठांनी प्रवास केला आहे. अशी माहिती एसटीच्या एका अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.

First Published on: May 16, 2023 10:28 PM
Exit mobile version