ठाण्यात खोलीच्या वादातून भावजयीसह दोघांवर चाकू हल्ला

ठाण्यात खोलीच्या वादातून भावजयीसह दोघांवर चाकू हल्ला

मुंबई पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका पोलीस जमादाराने खोलीच्या वादात सख्ख्या लहान भावजयीसह दोघांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ठाण्यातील किसन नगर परिसरात घडली. या चाकू हल्ल्यात २८ वर्षीय नातेवाईकाचा मृत्यू झाला असून श्रीनगर पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमी महिलेचे प्राण वाचू शकले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सेवानिवृत्त पोलीस जमादाराला अटक करून त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली.

महेंद्र सदाशिव कर्डक (५५) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस जमादाराचे नाव आहे. महेंद्र कर्डक हा मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (जमादार) होता. काही वर्षांपूर्वी त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ठाण्यातील किसन नगर येथे भावाच्या घरात राहणारा महेंद्र हा अविवाहित आहे. बुधवारी रात्री महेंद्र कर्डक याच्या भावाची पत्नी नीता राजन कर्डक (४३) हिने महेंद्रला घरातून बाहेर काढले आणि या खोलीत पुन्हा पाय ठेवायचा नाही, असे बजावले होते. लहान भावजयीने आपल्याला घरातून बाहेर हाकलले या रागातून बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महेंद्र हा नातेवाईक अजय कर्डक (२८) याच्यासोबत घरी आला. या दरम्यान नीता आणि महेंद्र यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून महेंद्रने सोबत आणलेला चाकू नीताच्या गळ्यावर फिरवला, मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या अजय याच्यावर त्याने चाकूने हल्ला केला.

या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्तरंजित अवस्थेत स्वतःला वाचवण्यासाठी बाहेर पडलेल्या नीता यांना पोलिसांनी ताबडतोब उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करून घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी महेंद्र हा हातात चाकू घेऊन उभा होता. त्याच्याशेजारी अजय हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी महेंद्रला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने स्वतःला मारून घेण्याची धमकी पोलिसांना दिली. मात्र, पोलीस शिपाई धोंडे यांनी तत्परता दाखवत महेंद्र याच्या हातातील चाकू काढून त्याला ताब्यात घेतले. तसेच जखमी अजयला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

यातील नीता हिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी दिली. याप्रकरणी महेंद्र कर्डक याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली.

First Published on: January 7, 2021 9:35 PM
Exit mobile version