रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी लवकरच प्राधिकृत अधिकारी

रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी लवकरच प्राधिकृत अधिकारी

कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी गुरुवारी दिली. मध्य रेल्वेवरील तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गाचे भूसंपादन, बुलेट ट्रेनमध्ये जमीन गेलेल्या केवणी आणि केवणीदिवे येथील शेतकऱ्यांना दिलेला अल्प मोबदला आणि कळवा-ऐरोली एलिव्हेटेट मार्ग आदीसंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी खासदार कपिल पाटील यांनी रखडलेल्या भूसंपादनाकडे लक्ष वेधले.

त्यावेळी नार्वेकर यांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करणार असल्याचे आश्वासन दिले. या बैठकीला मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक बी. के. झा, बुलेट ट्रेनचे अधिकारी शुक्ला, उप मुख्य अभियंता एच. जी. कोटके, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एस. के. चौधरी, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी ए. एस. थरगळे, एस. के. जैन, पी. के. श्रीवास्तव, प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर, अविनाश शिंदे, जयराज कारभारी, अभिजित भांडे-पाटील आदी उपस्थित होते.

कल्याण-कसारा दरम्यान तिसरा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाचे काम भूसंपादनाअभावी रखडले असल्याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. त्यानंतर या मार्गाच्या भूसंपादनासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. कळवा-ऐरोली एलिव्हेटेट मार्गाचे सिडकोने जमीन न दिल्यामुळे रखडले असल्याकडे लोकसभेचे लक्ष वेधण्यात आले होते.

त्यानंतर सिडकोने जमीन देण्याचे जाहीर केले आहे. तरी या संदर्भात वेळेत कार्यवाही होऊन जमीन मध्य रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती खासदार कपिल पाटील यांनी केली. भिवंडी तालुक्यातील केवणी, केवणी दिवे गावामध्ये बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादित करण्यात आली. मात्र, तेथील जमिनीचा शासकिय दर हा ७ लाख ६३ हजार रुपये प्रती गुंठा आहे. आजूबाजूंच्या गावांमध्ये देण्यात आलेल्या बाजारमूल्यापेक्षा तो कमी आहे, याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. या गावांचा बुलेट ट्रेनला पाठिंबा दिला असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. अखेर आजूबाजूंच्या गावांनुसार भरपाई देण्याचे आश्वासन बुलेट ट्रेनचे अधिकारी शुक्ला यांनी दिली.

First Published on: March 4, 2021 10:17 PM
Exit mobile version