बदलापूरचा पाणी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावणार

बदलापूरचा पाणी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावणार

बदलापूरचा पाण्याचा प्रश्न, मल्टी हॉस्पिटल व इतर प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. लवकरच यासाठी मंत्रालयात जम्बो बैठकीचे आयोजन करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने रविवारी येथील गायत्री गार्डनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी हे आश्वासन दिले. सुप्रिया सुळे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन करताना केंद्रापासून शहरापर्यंत सर्वच विषयांना हात घातला. त्या म्हणाल्या की, गॅस, पेट्रोल, डिझेल आदी सर्वांच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. यामुळे सर्वसाधारण जनता हैराण झाली आहे. याच महागाईच्या विरोधात टीका करीत २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले. गेल्या सहा वर्षात सतत महागाई, बेरोजगारी वाढत आहे. मात्र त्यावर ते ना काही बोलत आहेत ना कोणाचे ऐकत आहेत. यामुळे जनता कंटाळली असून त्यांना पर्याय हवा आहे. हा पर्याय शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने मिळाला आहे. हाच पर्याय भविष्यात केंद्रातही यशस्वी होईल असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पेट्रोल डिझेल, गॅस दरवाढ तसेच कृषी विधेयकाविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत केंद्र सरकारवर टीका केली. कार्यकर्त्यांना पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज रहा, असे आवाहन करतानाच या निवडणुकीत राष्ट्रवादीचे किमान १२ नगरसेवक निवडून यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते महेश तपासे, महिला प्रदेश चिटणीस दर्शना दामले, जिल्हा अध्यक्षा विद्या वेखंडे, माजी आमदार ज्योती कलानी आदी मान्यवर व्यसपीठावर उपस्थित होते.

देशमुख-दामले वादाची नेत्यांनी घेतली दखल
वाद पक्षाला हानिकारक असतात असे सांगून राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख आणि बदलापूर शहराध्यक्ष आशिष दामले यांनी आपसातील वाद मिटवून एकत्र काम करावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. हे घरातले वाद असल्याचे सांगून येत्या १५ दिवसात बैठक लावून हे वाद संपवावे लागतील, असे आव्हाड म्हणाले. सुप्रिया सुळे यांनीही हाच धागा पकडून देशमुख व दामले यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

First Published on: February 22, 2021 7:54 PM
Exit mobile version