शेअर रिक्षामध्ये दोन पेक्षा जास्त प्रवाशांना बंदी

शेअर रिक्षामध्ये दोन पेक्षा जास्त प्रवाशांना बंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगबाबत निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील शेअर रिक्षा प्रवासी वाहतुकीवर बंदी घालण्यात आली नसून दोन पेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. दोनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातच, शुक्रवारी आणि शनिवारी एकूण ७६७ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाईस सुरू झाली असून त्यांच्याकडून १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईत सर्वाधिक ११७ केसेस नारपोलीत तर सर्वात कमी म्हणजे शून्य केस विठ्ठलवाडीत नोंदवली गेलेली नाही. मात्र फ्रंट सीटच्या तीन केसेसची विठ्ठलवाडीत नोंद झालेली आहे. तसेच यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटोकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी केले आहे. तसेच, १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश लागू असून त्याचीही अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना पोलीस दलाला देण्यात आल्या आहेत. सरकार, पोलीस आणि पालिकेने वारंवार बजावल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. रिक्षात दोनच प्रवाशांना बसविण्याची मुभा असली तरी शेअर तत्वावर चालणाऱ्या रिक्षा आजही चार ते पाच प्रवाशांनाची ने आण करताना दिसतात.

त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या रिक्षाचालकांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी वाहतूक शाखेच्या सर्व विभागांना दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारपासून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी एकूण ३४१ रिक्षाचालक नियंमांचे उल्लंघन करून प्रवाशांची ने आण करताना आढळले आहेत. तर, शनिवारी ४२६ रिक्षाचालक या मोहिमेत दोषी आढळले आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. ११ रिक्षाचालकांनी जागेवर दंडाची रक्कम भरली असून उर्वरित रिक्षाचालकांकडून १ लाख ६८ हजार ५०० रुपयांची दंड वसुली शिल्लक असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

फ्रंट सीट नेणाऱ्या १०१ चालकांवर कारवाई
शेअर रिक्षांमध्ये प्रवाशांची ने आण करताना अनेक रिक्षाचालक प्रवाशांना आपल्या शेजारी बसवतात. शुक्रवारी फ्रंट सीटवर प्रवासी बसविणाऱ्यांच्या १०१ रिक्षाचालकांच्या विरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

” शेअर आणि मीटर रिक्षा मधून दोन जणांना प्रवास करण्याची मुभा आहे. दोनपेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात आली असून जास्त प्रवासी वाहतूक करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवार आणि शनिवारी कारवाई करण्यात आली असून या पुढेही कारवाई सुरू राहणार आहे.
– बाळासाहेब पाटील – उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे.

दोन दिवसांतील कारवाई तक्ता
उपशाखा- केसेस
ठाणेनगर ७१
कोपरी २०
नौपाडा ४७
वागळे ८९
कापूरबावडी १७
कासारवडवली २४
राबोडी ७०
कळवा ३१
मुंब्रा ४३
भिवंडी ०१
नारपोली ११७
कोनगाव २०
कल्याण १३
डोंबिवली ६६
कोळसेवाडी ५१
विठ्ठलवाडी ००
उल्हासनगर ६३
अंबरनाथ २४

एकूण ७६७

First Published on: February 21, 2021 10:36 PM
Exit mobile version