ठाकरेंच्या समर्थकासाठी शिंदेंचे समर्थक आले धावून, बंड्या साळवींसाठी आमदार भोईर यांची बॅटिंग

ठाकरेंच्या समर्थकासाठी शिंदेंचे समर्थक आले धावून, बंड्या साळवींसाठी आमदार भोईर यांची बॅटिंग

कल्याण – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक विजय उर्फ बंड्या साळवी यांना कल्याणच्या पोलिसांनी दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतून तडिपार करण्याची नोटीस बजावली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असतानाच अनेक वर्ष बंड्या साळवी यांच्या सोबत काम केलेल्या शिंदे समर्थक आ. विश्वनाथ भोईर, नगरसेवक जयवंत भोईरसह इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊन बंड्या साळवी यांची बाजू ऐकून मगच योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या समर्थकासाठी शिंदेंचे समर्थक धावून आल्याचं बोललं जात आहे.

विजय साळवी यांच्यावरील १५ गुन्हे हे जनतेसाठी केलेल्या, दुर्गाडी, मलंगगड आंदोलनासंदर्भात आहेत. पण सत्तेचा आधार घेऊन बाहेरील एका उमद्या नेत्याच्या आग्रहावरुन ही कारवाई करण्यास भाग पाडण्यात आल्याची कल्याणमधील शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे. साळवी यांची कार्यपद्धती अनेक वर्ष अनुभवलेल्या शिवसैनिकांना त्यांच्यावर झालेली कारवाई पसंत नसल्याने अखेर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, मोहन उगले व इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त गुंजाळ यांची भेट घेतली. साळवी यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी द्यावी. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मग पोलीस प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी आमदार भोईर यांनी केली आहे.

या निवेदना संदर्भात आमदार भोईर यांनी सांगितले, या तडिपारीच्या नोटीसीवरुन साळवी यांनी संपर्क साधला. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. हे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आमदार भोईर यांनी आपण शिवसेनेतील कोणत्या बाजुचे आहोत याचा कोणताही विचार न करता आपला एका जुना कट्टर समर्थक अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याला आपल्यापरीने त्यांना साहाय्य करणे हे आपले कर्तव्य समजून त्यांच्या मदतीसाठी आमदारांनी धाव घेतली, असे शिंदे समर्थक शिवसैनिकांनी सांगितले.

विजय साळवी यांच्यावरील गुन्हे राजकीय स्वरुपाचे आहेत. त्यांना तात्काळ तडिपार करणे योग्य होणार नाही, असे निवेदन आमदार भोईर यांनी पोलीस उपायुक्त गुंजाळ यांना दिले. सर्व कायदेशीर बाजू तपासून साळवी यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.

अशा कारवायांमध्ये शासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही किंवा साळवी यांच्यावर कोणाचाही आकस नाही. राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. अशा कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यस्त आहेत. त्यामुळे अशा कामांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांना अजिबात वेळ नाही, असे आमदार भोईर यांनी सांगितले.

दोन वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेत आमदारकीचा उमेदवार निवडीवरुन संघर्ष सुरू होता. या चढाओढीत सचिन बासरे, विजय साळवी, दिवंगत प्रकाश पेणकर, दिवंगत राजेंद्र देवळेकर, अरविंद मोरे यांची नावे चर्चेत होती. यावेळी झालेल्या शिवसेना वरिष्ठ नेत्यांच्या सामोपचाराच्या बैठकीत विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी देण्यात यावी असे मत मांडण्यात विजय साळवी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. याची जाणीव आमदार भोईर यांना असल्याने ते साळवी यांच्या मदतीला धावले असल्याचे शिवसैनिकांच्या चर्चेतून समजते.

First Published on: September 29, 2022 4:33 PM
Exit mobile version