घर, पाणीपट्टी वसुलीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा आधार

घर, पाणीपट्टी वसुलीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा आधार

कोरोना या आजाराचा प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. त्यानुसार त्याचा परिणाम ठाणे जिल्हा परिषदेच्या घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर देखील झाल्याने थकबाकीदारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली होती. याची दाखल घेत, ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यामतून एक लाख 21 हजार थकबाकीदारांना राष्ट्रीय लोक अदालातीच्या माध्यामतून नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यापैकी 26 हजार थकबाकीदारांकडून 8 कोटी 4 लाखांची विक्रमी वसुली करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, बँक वसुली प्रकरणे, मोटार अ़पघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येत असतात. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांकडून कर वसुली करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावरून थकबाकी खातेदारांना नोटीसा बजाविण्यात आली होत्या. या नोटीसीला प्रतिसाद देत, काही थकबाकीदारांनी थकीत कर भरल्याने जिल्ह्याची घरपट्टी व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यातील एक लाख 21 हजार 534 खातेदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या. यामध्ये 95 हजार खातेदार हे घरपट्टी खातेदार असून 25 हजार 584 हे पाणीपट्टी खातेदार आहे. यापैकी 19 हजार 217 घरपट्खाटी खातेदारांकडून सर्वाधिक सात कोटी 3 लाख 97 हजार 876 वसुली करण्यात आली असून 6 हजार 940 पाणीपट्टी खातेदारांकडून एक कोटी 10 हजार 940 इतकी वसुली करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली. या विक्रमी वसुलीमुळे ग्रामीण भागातील विकासकांसाठी निधी उपलब्ध झाला असून त्यातून अधिक विकासात्मक कामे करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी वसुलीबाबत एक लाख 21 हजार 534 खातेदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यातून 8 कोटी 4 लाख इतकी वसुली करण्यात आली. ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी कर्मचार्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे हे यश गाठता आले.
– प्रमोद काळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी(पंचायत), ठाणे, जि.प.

First Published on: March 13, 2023 10:32 PM
Exit mobile version