भाजपाचे ‘डाव’ खरे होण्यापूर्वी फसले

भाजपाचे ‘डाव’ खरे होण्यापूर्वी फसले

ठाणे महानगर पालिका

कोरोनाच्या कालावधीतील अनधिकृत बांधकामांवरून अतिक्रमण विभागाला घेरण्यासाठी भाजपाने केवळ दिव्यातीलच नाही तर संपूर्ण ठाणे शहरातील बांधकामाबाबत लक्षवेधी मांडण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेनेने लक्षवेधी घेता येणार नाही, असे सांगत, या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार त्यांनी तो अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे यावर चर्चा करु नका असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले. त्यामुळे शहरातील अनाधिकृत बांधकामांची लक्षवेधी केवळ वाचून सत्ताधाऱ्यांनी गुंडाळण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे भाजपचे ‘डाव’ खरे होण्याऐवजी फसताना दिसले.

भाजपचे माजी गटनेते संजय वाघुले यांनी शहरात कोरोनाच्या काळात झालेल्या दिव्यासह, मुंब्रा, कळवा, घोडबंदर, माजिवडा आणि संपूर्ण ठाणे शहरात सुरु असलेल्या अनाधिकृत बांधकामांसंदर्भात गुरुवारी पार पडलेल्या महासभेत लक्षवेधी मांडली होती. या बांधकामांमुळे महापालिकेच्या पायाभूत सोई सुविधांवर ताण आल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे. तसेच यामुळे पाणी टंचाईच्या समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. तसेच पालिकेच्या उत्पन्नावर देखील यामुळे परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी झालेल्या महासभेत देखील महापौरांनी या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु तो अहवाल देखील अद्याप सादर झालेला नाही.

अशातच ठाणे शहरात कोरोनात अनाधिकृत बांधकामे वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अनाधिकृत बांधकामांवरुन भाजपने प्रशासनाला घेरण्याच्या प्रयत्नात असताना त्या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर अपेक्षेप्रमाणे चर्चा झालीच नाही. लक्षवेधी चर्चेला येताच क्षणी महापौर नरेश म्हस्के यांनी मागील महासभेचा संदर्भ देत, याबाबत काय कारवाई झाली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता प्रशासनाने त्याचा अहवाल माझ्याकडे सादर केलेला आहे. त्यामुळे या लक्षवेधीवर चर्चा करु नये, तुम्हाला देखील तो अहवाल दिला जाईल त्यानंतर यावर चर्चा करा अशी सूचना महापौरांनी केली. अशाप्रकारे ही लक्षवेधीचे वाचन झाल्यानंतर ती गुंडाळली गेली.

First Published on: February 18, 2021 10:02 PM
Exit mobile version