ठाण्यात महापौरांविरोधात भाजपची पोस्टरबाजी

ठाण्यात महापौरांविरोधात भाजपची पोस्टरबाजी

नियमबाह्य रित्या कोरोना लस घेणारे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यावर भारतीय जनता पक्षाने २४ तासात दुसर्‍यांदा हल्लाबोल केला आहे. महापालिका मुख्यालयापासून शहरात पोस्टर लावत, महापौरांचा निषेध केला आहे. तसेच महापौरांचे लाड कशाला, असा सवालही या माध्यमातून उपस्थित केला आहे. यावरून सेना-भाजपमधील पोस्टर वॉर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातच, लस मिळावी यासाठी आलेले (फ्रंड वर्कर) डॉक्टरांना नोंदणी बंद झाल्याचे सांगून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान शहरभर लावलेली पोस्टर सत्ताधार्‍यांनी सत्तेचा गैरवापर करत महापालिका प्रशासनाला काढण्यास लावल्याचा आरोप भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला.

कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असताना ठाणेकर नागरिकांना वार्‍यावर टाकत, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नियम डावलून स्वत: कोरोना लस घेण्यासाठी पहिला नंबर लावत लस टोचून घेतली. त्यावेळी महापौरांच्या बरोबर शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी कोरोना लस घेतली. असा प्रकार म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यानंतर लस पूर्णपणे सुरक्षित आहे. हे सर्वांना समजण्याकरता लस घेतली असल्याचा दावा ठाण्याच्या महापौरांचा केला आहे. त्यातच, याबाबत महापौर हे सरकारी आदेश दाखविणार, असा खोचटपणे प्रश्न ही ठामपा भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी करत याबाबत त्यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र पाठवून ठाण्यामध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत लक्ष वेधून आतापर्यंत ठाणे शहराला पुरवठा केलेली लस सत्तेचा गैरवापर करून कोणाला दिली आहे का, नक्की किती फ्रंटलाईन वर्कर्सना लस मिळाली. याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीला २४ तास होत नाही तोच शुक्रवारी सकाळीच भाजपने ठाण्याच्या महापौरांविरोधात शहरात पोस्टर लावून टीकास्त्र सोडले आहे.

असे आहे पोस्टरवर मजकूर

महापालिका मुख्यालयासह शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरवर, ’कोरोना योद्धे ठाण्याचा अभिमान त्यांना सर्वप्रथम लस मिळणे हा त्यांचा अधिकार, सेना आमदार, महापौरांनी लायनीत घुसून त्यांचा केला अपमान’, अशा आशयाचे पोस्टर सध्या सर्वाचे लक्ष वेधले आहे. शिवसेना राष्ट्रवादी भाऊ भाऊ दोघे मिळून जनतेच्या पैशावर मजा मारु असा आशयही नमूद केला आहे. पोस्टरबाजीतून भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष केले आहे.

सत्तेचा गैरवापर – भाजपचा आरोप

महापौर आणि शिवसेनेच्या आमदाराने घेतलेल्या लसीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने थेट महापौरांना लक्ष्य करीत त्यांच्या विरोधात शहरभर पोस्टर क्षेपणास्त्र केले.परंतु पोस्टर मजकूर शिवसेनेला झोंबल्याने त्यांनीच ते पालिकेच्या अतिक्रमण विभागाला सांगून अवघ्या काही तासातच ती पोस्टर खाली उतरवली. दुसरीकडे मात्र पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेले अनाधिकृत पोस्टर आजही उतरविण्यात आलेले नाहीत. त्याकडे पालिकेच्या या विभागाचे लक्ष कसे गेले नाही असाही सवाल याबाबत भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला.

हेही वाचा –

पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो कुटुंबांचे ठाण्यात स्थलांतर

First Published on: February 27, 2021 6:32 PM
Exit mobile version