सेंट्रल पार्क ठाणेकरांचे की विकासकाचे, मनसेचा सवाल

सेंट्रल पार्क ठाणेकरांचे की विकासकाचे, मनसेचा सवाल

ठाणे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या बदल्यात ढोकाळी येथील २० एकरचा भुंखडा कल्पतरु या विकासकाला विकसित करण्यासाठी देण्यात आला होता. २०१७ मध्ये येथे सेंट्रल पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजनही करण्यात आले होते. परंतु तीन वर्षे उलटूनही हे सेंट्रल पार्क ठाणेकरांना उपलब्ध का झाले नाही. असा सवाल मनसेचे शहर उपाध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी उपस्थित केला आहे. ते ठाणेकरांना मिळणार आहे का ? की विकासच्या घशात घातले जाणार आहे. असा सवाल त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे. त्यामुळे सध्या या पार्कची स्थिती काय आहे, ठाणेकरांच्या सेवेत ते दाखल होणार की नाही, याची उत्तरे मिळावीत अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. परंतु या बाबत अपेक्षित उत्तरे न मिळाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून ढोकाळी भागात २० एकरवर सेंट्रल पार्क उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. या संदर्भातील प्रस्तावही २०१७ मध्ये झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला होता. यातून ठाणेकरांना बाहेर कुठेही न जाता येथेच पर्यटनाचा आनंद मिळावा हा चांगला हेतू या मागे होता. परंतु आता या हेतूलाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते २०१७ मध्ये विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेवून या पार्कचे भुमीपुजनही करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षात हे पार्क ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणो अपेक्षित होते. त्यानुसार या पार्कचे काम कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या बदल्यात विकसित करण्यासाठी कल्पतरु या विकासकाला देण्यात आले होते. परंतु आजही हे काम पूर्ण का होऊ शकले नाही, असा सवाल विचारे यांनी केला आहे. आता तर हे पार्क ठाणेकरांचे आहे की, विकासकाच्या मालकीचे याबाबतही शंका उपस्थित होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गुगलवर सर्च केल्यास विकासकाने आपल्या गृहसंकुलातील प्लॅटची विक्री करण्यासाठी हे पार्क गृहसंकुलाचाच एक भाग असल्याचे भासवून आपल्या प्लॅटचीही विक्री केल्याचेही दिसत आहे. त्यामुळे हे पार्क विकासक घशात घालणार या बाबत शंका निर्माण झाली आहे. एकूणच या सर्व परिस्थितीचा विचार करुन हे पार्क आता ठाणेकरांसाठी आहे की, विकासकासाठी याचे उत्तर मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. अन्यथा आम्हाला या पार्कसाठी आंदोलन उभे करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा –

भाजप-मनसे युतीचे संकेत, राज ठाकरे करणार घोषणा?

First Published on: January 29, 2021 4:53 PM
Exit mobile version