एकाच महिलेला तीन वेळेस डोस दिल्याचा आरोप

एकाच महिलेला तीन वेळेस डोस दिल्याचा आरोप

एकीकडे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसबाबत विचारणा करण्यास गेलेल्या सावरकरनगर येथील वयोवृद्ध व्यक्तीला लस न घेता, लस घेतल्याचे सायंकाळी प्रमाणपत्र मोबाईलवर प्राप्त झाल्याची धक्कादायक बाब ताजी असताना आता ठाण्यातील ब्रह्मांड येथील रुपाली साळी या महिलेला कोरोना लसीचा तिसरा डोस दिल्याची बाब पुढे आली आहे. या संदर्भात भाजपने महापालिकेने त्या महिलेची उपचाराची जबाबदारी घ्यावी असे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. तर महापालिका प्रशासनाने त्या महिलेला तीन वेळा डोस दिलेला नाही; पण त्या महिलेला तीन वेळा टोचल्याने रिअ‍ॅक्शन आल्याचे म्हटले आहे. पण त्यांची प्रकृती व्यवस्थित असून महापालिकेचे डॉक्टर त्या महिलेसह तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

ठामपाच्या घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड येथील लसीकरण केंद्रावर रुपाली साळी नामक महिलेला तीन वेळा कोरोना लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पत्रव्यवहार करत, साळी नामक महिला कोरोना लसीचे तीन डोस दिल्याप्रकरणी संबंधित महिलेच्या उपचाराची जबाबदारी महापालिकेने घ्यावी असे म्हटले आहे. तसेच तात्काळ त्या महिलेची आरोग्य तपासणी करून उपचाराचा खर्च करावा, त्याचबरोबर भविष्यातील आजारावर उपचार करण्याबाबत जबाबदारी स्वीकारावी. तसेच संबंधित प्रकरणात दोषी असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तीन वेळेस डोस दिलेला नाही
‘त्या महिलेला तीन वेळा डोस दिलेला नाही. तीन वेळा सुई टोचले गेल्याने तिला रिअ‍ॅक्शन झाली आहे. तिच्या कुटुंबियांशी महापालिकेचे डॉक्टर संपर्कात आहेत. आता साळी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीकडे डॉक्टर लक्ष ठेवून असल्याने चिंतेचे कारण नाही.”
–संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा.

First Published on: June 29, 2021 3:45 AM
Exit mobile version